
पुण्यात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू प्रेरणा पुरस्कार सोहळा उत्साहात; देशभरातील मान्यवरांचा गौरव • तीन ज्येष्ठ दाम्पत्यांचा पुनर्विवाह ठरला कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण

पंचनामा प्रतिनिधी : “राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, शिक्षण, सामाजिक न्याय, बंधुता आणि मानवतेचा विचार हा आजच्या भारताला नवी दिशा देणारा आहे. समाजपरिवर्तनासाठी अशा विचारांचा जागर प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी केले.

शांतिदूत परिवार, डॉ. सुरेश डी. एस. राठोड फाउंडेशन व सर्किट बेंच फाउंडेशन संचलित इंडियन पोलीस मित्र भारत यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन, पुणे येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित “लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू प्रेरणा पुरस्कार” वितरण सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

कलानगरी कोल्हापूरच्या सामाजिक समतेच्या विचारांचा जागर आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे नगरीत मानवता, सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेचा अनोखा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा “लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू प्रेरणा पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी.ए. डॉ. शंकर अंदानी होते. प्रमुख उपस्थितीत पद्मश्री उदय देशपांडे, अतिरिक्त आयुक्त (IRS) शिवकुमार साळुंखे, बी. ए. पाटील, डॉ. पंकज भिवटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. विठ्ठल जाधव (IPS) आणि डॉ. सुरेश कि. राठोड यांनी केले.

आपल्या मनोगतात प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी शांतिदूत परिवार, डॉ. सुरेश डी. एस. राठोड फाउंडेशन आणि सर्किट बेंच फाउंडेशन यांच्या समाजहिताच्या उपक्रमांचे मुक्तकंठाने कौतुक केले. कोल्हापूरमधील संस्मरणीय आठवणींना उजाळा देताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेतील काही अनुभवही उपस्थितांसमोर मांडले. समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी अशा विधायक उपक्रमांची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुनर्विवाह सोहळ्याने सभागृह भारावले
कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण ठरला तो तीन ज्येष्ठ दाम्पत्यांचा पुनर्विवाह सोहळा. जमदाडे परिवार (४० वर्षे), बाबर परिवार (३८ वर्षे) आणि कुंभार परिवार (२८ वर्षे) यांनी यशस्वी वैवाहिक सहजीवनाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा पारंपरिक विधीपूर्वक पुनर्विवाह संपन्न करण्यात आला. अनेक वर्षांपूर्वीच्या मंगलक्षणांना नव्याने उजाळा मिळाल्याने उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

देशभरातील मान्यवरांचा गौरव
या सोहळ्यात भरत खांडेकर, बी. ए. पाटील, सुमन देसाई, अनिता पाटील, अण्णा नाईक, मनोज शिंदे, प्रा. सुरेश राठोड, प्रियंका धनवडे, संजय पवार, भूषण ठाकरे, श्रद्धा सिंदगीकर, अशोक मोहिते, शिवाजीराव जमदाडे, कीर्ती जाधव, राणी खंडागळे, शिवाजी देसाई, कृषिभूषण तानाजी दवंग, अर्चना गुरव, पूजा सावंत, जीवन बाणेकर, अशोक जाधव, स्वप्निल गुरव, ॲड. अमोल पाटील, सुरेश संकपाळ, अनिल साळवी, योगेश अग्रवाल, शीघ्रकवी बाळासो मोहिते (मामा), नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील, विलास बाबर, अनिल घोडके, डॉ. निखिल पाटील, मनीषा मोरे, विद्याश्री मांडवकर, रसिका कदम, निवास पाटील, ज्योती शेटे, योगिता सावंत, गायत्री क्षीरसागर, राजीव केळकर, सुरेश जेधे, सचिन वायकुळे, सुप्रिया शिंदे, अभिमान गायकवाड, मेघा शहा, वैशाली जोशी यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू प्रेरणा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

समतेच्या विचारांचा जागर
समाजातील सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव, ज्येष्ठ दाम्पत्यांच्या पुनर्विवाहातून भारतीय कुटुंबव्यवस्थेचा सन्मान आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समता, शिक्षण, सामाजिक न्याय व मानवतेच्या विचारांचा जागर या त्रिसूत्रीवर आधारित हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी, प्रेरणादायी उपक्रम आणि मानवी मूल्यांचा संदेश देणारा हा सोहळा पुणे शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनातील एक संस्मरणीय पर्व ठरला..



