
पंचनामा विशेष – पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदरभाऊ कामटे यांचे आज दुःखद निधन झाले. हवेली तालुक्यातील कोंढवा हे त्यांचे मूळ गाव.
जालिंदर भाऊ आणि माझा वैयक्तिक जवळचा स्नेहबंध. पत्रकार असलो तरी भाऊ मित्र. जालिंदरभाऊ अध्यक्ष झाल्यानंतर ते मला म्हणाले, विठ्ठल तुमच्या गावातले एखादं काम मला सांगा. आपल्याकडे निधी आहे. मला तात्काळ काही सुचत नव्हते. दोन-तीन दिवसांनी धामणी आलो. आपल्या गावची पूर्वेकडील वैभवशाली वेस भग्न अवस्थेत होती. आणि मनात विचार आला सरकारी निधीमधून धामणी गावच्या वेशीचे बांधकाम होऊ शकेल का ? पुण्याला आल्यावर अधिकाऱ्यांना बोलवले. चर्चा केली. जिल्हा परिषदेच्या सेस मधून तुम्ही नवीन योजना घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वसाधारण सभेमध्ये धोरण ठरवावे लागेल आणि लेखाशीर्ष निर्माण करावे लागेल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही गोष्ट जालिंदर भाऊंच्या लक्षात येतात त्यांनी पदाधिकाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची चर्चा करून पुणे जिल्ह्यातील गावांचा पार आणि स्वागत कमान बांधण्याची योजना आणली. ज्या योजनेत धामणी गावातील वेशीचे चे पहिले काम मंजूर केले. 2001-02 मध्ये त्यावेळी 2 लाख रुपयांची खास तरतूद केली. या निधीमधून गावचे टुमदार वैभवशाली वेस पुन्हा उभी राहिली. या वेशीच्या कामाच्या भूमिपूजनासाठी जालिंदरभाऊ धामणी मध्ये होते. जंगी कार्यक्रम भूमिपूजनाचा झाला. नंतरही भाऊंनी आणखी निधी दिला. डीआरडीए मधून मारुती मंदिरापुढील व्यापारी गाळे, धामणी गावातील पाणी योजनांसाठी जालिंदर भाऊंचे योगदान मोठे आहे.त्यानंतरही जालिंदर भाऊ एक दोन वेळा धामणी ला येऊन गेले.
जालिंदर भाऊ 1999 ते 2002 या कालावधीमध्ये तीन वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले. विद्यार्थी संघटना आणि पुढे युवक काँग्रेसच्या चळवळीतून तयार झालेले जालिंदर कामटे हे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्यांचा लौकिक होता. पुणे शहरातील विद्यार्थी चळवळी तसेच पुणे विद्यापीठावरील त्यांची अनेक आंदोलने गाजली.
काँग्रेस नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांचे ते खंदे समर्थक. त्यांच्या पत्नी जयश्री कामठे या 1992 ते 98 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि महिला आणि बालकांच्या समितीच्या सभापती होत्या. 1997 मध्ये जालिंदर कामटे हे जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर 1999 मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. राजकारणासाठी हवेली तालुक्याबरोबरच पुरंदर तालुक्यातील त्यांनी आपले राजकीय कार्यक्षेत्र निर्माण केले. स्वर्गीय वसंत दादा पाटील हे त्यांच्या गुरुस्थानी होते. त्यांच्या नावाने त्यांनी कोंढवा येथे शाळा सुरू केली.
काँग्रेस पक्ष फुटून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी पुणे जिल्ह्यात जालिंदर कामठे यांनी शरद पवार यांच्या बाजूची भूमिका घेतली. त्यावेळी शरद पवार यांच्या समर्थकांची पहिली बैठक जालिंदर कामटे यांच्या क्वीन्स गार्डन येथील जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्याच्या आवारामध्ये झाली.
संपूर्ण पुणे जिल्ह्याचा राजकीय आवाका असलेले जालिंदरभाऊ काही काळ भाजपमध्ये कार्यरत होते. त्यानंतर गेल्या एक -दीड वर्षांपूर्वी त्यांनी पुन्हा स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस मधून आपले काम सुरू केले. आपले मित्र स्वर्गीय रामभाऊ बराटे यांच्या नावाने आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार त्याचबरोबर समाजातील सामाजिक क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार त्यांनी सुरू केले.
पुण्यामध्ये राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील मथुरा त्यानंतरचा सुभद्रा कट्टा ही गेल्या 30-40 वर्षापासूनची ओळख जालिंदर भाऊ कामठे यांनी पुणे शहर जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला मिळवून दिली.
जालिंदर यांची धडाडी, कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका पत्रकार म्हणून मी पाहिली आहे.
जालिंदरभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली..
शब्दांकन – ॲड.श्री.विठ्ठलराव जाधव (उप संपादक दैनिक सामना)
