सामाजिक

लोककलावंतांचा वारंवार होणारा अपमान थांबला पाहिजे;पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या नाराजी मागील वेदना समजून घेण्याची गरज !!

fb img 1782792706149
fb img 1782792706149

पंचनामा विशेष- पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या समरसता लोककला महोत्सवात घडलेली घटना ही केवळ एका कार्यक्रमातील नाराजी नसून, ती महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या अनेक वर्षांच्या वेदनेचा उद्रेक आहे. पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल व्यक्त केलेली नाराजी ही व्यक्तिगत नव्हती, तर संपूर्ण लोककला क्षेत्राच्या उपेक्षेचा आवाज होता.

लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आत्मा आहे. तमाशा, लावणी, गोंधळ, भारूड, वासुदेव, पोवाडा, कीर्तन, शाहिरी अशा अनेक लोककला शतकानुशतके समाजाचे प्रबोधन आणि मनोरंजन करत आहेत. मात्र या कलेला जिवंत ठेवणारे लोककलावंत आजही उपेक्षा, असुरक्षितता आणि आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहेत.

पुण्यातील या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची उपस्थिती अपेक्षित होती. लोककलावंतांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर त्यांच्याशी थेट चर्चा होईल, अशी आशा होती. मात्र दोन्ही मान्यवर अनुपस्थित राहिल्याने लोककलावंतांची अपेक्षा भंगली. त्याच भावनेतून पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, एका महिन्यात लोककला महोत्सवाचा कार्यक्रम आणि लोककलावंतांच्या प्रश्नांवर चर्चा न केल्यास पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला.

खरे पाहता, नाटक, चित्रपटांच्या किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना मंत्री, आमदार, खासदार आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्या कार्यक्रमांना शासनाचे मोठे पाठबळही मिळते. मात्र लोककलेच्या कार्यक्रमांबाबत मात्र नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. लोककलावंतांचे कार्यक्रम असतील तर अनेकदा मंत्रीमहोदय वेळ देत नाहीत किंवा टाळाटाळ करतात. ही बाब अत्यंत वेदनादायी आहे. लोककलावंत हे केवळ मनोरंजन करणारे कलाकार नाहीत, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे खरे रक्षक आहेत. त्यांनी आयुष्यभर गावोगावी फिरून लोकसंस्कृती जपली, समाजप्रबोधन केले आणि आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख जगभर पोहोचवली. तरीही त्यांना आजही मान-सन्मानासाठी संघर्ष करावा लागतो, ही शोकांतिका आहे.

गावोगावी कार्यक्रम करताना अनेक प्रशासकीय अडचणी, पोलिसांचा त्रास, मानधनातील विलंब, स्थानिक स्तरावरील त्रास आणि मूलभूत सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांना लोककलावंतांना सामोरे जावे लागते. याशिवाय, लोककला सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकाचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अशा प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची वेळ आता आली आहे.
पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केलेली नाराजी ही कोणत्याही व्यक्तीविरोधातील भूमिका नसून, ती संपूर्ण लोककला क्षेत्राच्या न्याय्य हक्कांसाठी केलेली आर्त हाक आहे.
शासनाने या आवाजाची दखल घेत लोककलावंतांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

लोककला वाचली तरच महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जिवंत राहील. लोककलावंतांचा सन्मान हा केवळ पुरस्कार देऊन होत नाही, तर त्यांच्या प्रश्नांना न्याय देऊन, त्यांच्या कार्यक्रमांना प्रतिष्ठा देऊन आणि शासनाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांना योग्य स्थान देऊनच खऱ्या अर्थाने होतो. आज गरज आहे ती लोककलावंतांकडे केवळ मनोरंजन करणारे कलाकार म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे खरे शिल्पकार म्हणून पाहण्याची. त्यांच्या सन्मानासाठी शासन, प्रशासन आणि समाज या तिन्ही स्तरांवर संवेदनशीलता आणि ठोस कृती अपेक्षित आहे.

लोककलावंतांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान. हा सन्मान आता शब्दांत नव्हे, तर कृतीतून दिसला पाहिजे.


शब्दांकन – अरुण खरात

Related posts

हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध– राज्यमंत्री योगेश कदम

Chief Editor

मंचर (ता.आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिनव पद्धतीने केले अभिवादन !!

Chief Editor

मंदिरात रोख रक्कम दान करण्याच्या बहाण्याने महिलेचे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले !!

Chief Editor

Leave a Comment