
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, वडगावपीर व मांदळेवाडी परिसरात जून ते जुलैअखेर पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात पेरणी झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे पिकांना चांगला आधार मिळाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सध्या परिसरात अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी अपेक्षित दमदार पाऊस होत नसल्याने खरीप पिकांना पाण्याची गरज भासत आहे. विशेषतः पेरणी केलेल्या पिकांसाठी आगामी काही दिवसांत चांगला पाऊस होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे लोणी-धामणीसह पूर्व भागातील शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत असून, वरुणराजाने लवकर कृपा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




