सामाजिक

जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक सौदागर घुमट !!

1009557393

पंचनामा विशेष – नारायणगाव ते जुन्नर या मार्गाने जुन्नरकडे प्रवास करताना जुन्या एस.टी. स्टॅण्डजवळ उभारलेली भव्य दगडी वेस आपल्या नजरेत भरते. या वेशीच्या पूर्वेकडे आमरापूरकडे जाणारा डांबरी रस्ता आहे. या मार्गाने साधारण दोन किलोमीटर अंतर पार केल्यानंतर डाव्या बाजूस उभी असलेली ही विशाल आणि देखणी वास्तू म्हणजेच “सौदागर घुमट” इतिहासाच्या वैभवाची साक्ष देताना दिसते.

सतराव्या शतकातील निजामशाही राजवटीत उभारण्यात आलेली ही वास्तू मुघलकालीन स्थापत्य शैलीचा एक अप्रतिम नमुना मानली जाते. निजामशाहाचा वजीर मलिकांबर याच्याशी या वास्तूचा संबंध असल्याचे सांगितले जाते. आफ्रिकेतील हाबसन प्रांतातून आलेला मलिकांबर जुन्नर येथील हबशीबाग परिसरात वास्तव्यास होता. आज याच परिसराला “हापूसबाग” म्हणून ओळखले जाते.

सुमारे ५५ फूट रुंद आणि ६० फूट लांब अशा कोरीव दगडी शिळांमधून साकारलेली ही चौरसाकृती वास्तू प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. जवळपास ५० फूट उंच नक्षीदार भिंतींवर उभारलेला तब्बल ३० फूट उंचीचा भव्य घुमट स्थापत्यकलेचा अद्भुत आविष्कार अनुभवायला लावतो.

या वास्तूच्या आतील भागात नऊ समाध्या असून येथे दिलेला आवाज नऊ वेळा प्रतिध्वनीत होतो, हा अनुभव पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. तसेच आतील भिंतींवर कुराणातील आयते कोरलेली दिसून येतात, ज्यामुळे या वास्तूचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.

इतिहास अभ्यासकांच्या मते, ही वास्तू मलिकांबरशी संबंधित एखाद्या मान्यवर व्यक्तीचे स्मारक असण्याची शक्यता आहे. पुरातत्त्व विभागाने या वास्तूचे मजबुतीकरण केल्यामुळे आज हजारो पर्यटक या ऐतिहासिक ठेव्याला भेट देत आहेत.

fb img 1774661444136

Related posts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रिस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा ; मागण्यांबाबतचे विषय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्याचा निर्णय !!

Chief Editor

श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा जागर ; खडकवाडीच्या श्री भैरवनाथ महाराज यात्रेचा अद्वितीय वारसा !!

Chief Editor

Leave a Comment