
पंचनामा प्रतिनिधी कनेरसर – कनेरसर येथील एमआयडीसी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने कंपनी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संधार आणि डायमंड कंपनीच्या बाजूला असलेल्या डोंगर परिसरात बिबट्या निवांत फिरताना दिसून आल्याची माहिती नागरिकांनी दिली.
एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर कंपन्या असून दिवस-रात्र कामगारांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर आढळून आल्याने विशेषतः नाईट शिफ्टला जाणाऱ्या आणि रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन संबंधित परिसराची पाहणी करावी तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कंपनी कामगारांकडून करण्यात येत आहे. गरज भासल्यास बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशीही मागणी होत आहे.

दरम्यान, नाईट शिफ्टला जाणाऱ्या तसेच रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या कामगारांनी शक्यतो एकट्याने प्रवास टाळून समूहाने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डोंगरालगतच्या व निर्जन परिसरात वावरताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.
बिबट्या आढळल्यास त्याच्या जवळ जाणे, पाठलाग करणे अथवा त्याला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. वनविभागाने परिसरात पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.




