
श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सेवकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न !!

पंचनामा प्रतिनिधी – आजच्या बँकिंग क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असून, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, कामातील जिद्द आणि अविरत कष्टाची तयारी आणि सोबतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आवश्यक आहे. हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन मा.खासदार शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील यांनी केले.

भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लांडेवाडी चिंचोडी या संस्थेच्या सेवकांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना आढळराव पाटील बोलत होते.

बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि खासगी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमधील वाढती स्पर्धा यामुळे सहकारी पतसंस्थांसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांचा विश्वास संपादन करून पारदर्शक व दर्जेदार सेवा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेच्या प्रगतीमध्ये सेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्येक कर्मचाऱ्याने संस्थेची प्रगती हीच आपली वैयक्तिक जबाबदारी समजून कार्य केले पाहिजे. सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रामाणिक कष्ट यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असेही आढळराव पाटील यांनी नमूद केले.

जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसमोर एक निश्चित ध्येय असणे अत्यंत आवश्यक आहे. ध्येय नसलेले जीवन म्हणजे दिशाहीन प्रवासासारखे असते. आपल्याला भविष्यात काय करायचे आहे आणि कोणते यश मिळवायचे आहे हे स्पष्टपणे ठरवणे म्हणजे ध्येय निश्चित करणे होय.

ध्येय निश्चित करताना आपल्या क्षमता, आवड आणि परिस्थितीचा विचार करावा. मोठे ध्येय असले तरी ते साध्य करण्यासाठी छोटे-छोटे टप्पे ठरवावेत,ध्येय निश्चित केल्यानंतर ते प्राप्त करण्यासाठी नियमित अभ्यास, कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य आवश्यक असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी या प्रसंगी सांगितले.

यशाच्या मार्गावर अनेक अडचणी येतात. कधी अपयश येते, तर कधी निराशा येते. पण अपयशाने खचून न जाता त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. “प्रयत्नांती परमेश्वर” या उक्तीप्रमाणे सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला एक ना एक दिवस यश निश्चित मिळते.
म्हणूनच आपण जीवनात योग्य ध्येय निश्चित करूया, त्यासाठी नियोजनबद्ध मार्ग निवडूया आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानता अविरत परिश्रम करूया. कारण—ध्येय मोठे ठेवा, प्रयत्न सातत्याने करा आणि यश मिळेपर्यंत थांबू नका यश आपलेच असल्याचे प्रतिपादन संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रमेश खरमाळे या प्रसंगी केले.

या वेळी संस्थेच्या संचालिका कल्पनाताई आढळराव पाटील, संचालक महेश ढमढेरे, हनुमंत तागड,रामशेठ तोडकर,आबा लांडगे,भिकाजी बोकड,तज्ञ संचालिका अंजली थोरात यांनी आपले विचार व्यक्त केले.

वार्षिक स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने संस्थेच्या सेवकांनी एकत्र येत आपापसातील संवाद व स्नेह वृद्धिंगत केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.








