
पंचनामा प्रतिनिधी – कळंब येथील स्व. ना. अजितदादा पवार जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल येथे जिल्हा परिषद, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चांडोली बुद्रुक केंद्रातील पंधरा शाळांतील बहात्तर प्राथमिक शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच उत्साहात संपन्न झाली.
प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका आणि शिक्षण विस्तार अधिकारी शैला निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती पूजनाने करण्यात आली. कळंब शाळेतील विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी केंद्रप्रमुख सीमा कहडणे, मुख्याध्यापक हेमराज भदाणे, दिपाली अजाब, मीना निऱ्हाळी, कृष्णराव हुले, अश्विनी मेंगडे, सतिश वाव्हळ, रवींद्र थोरात, दत्ता गोरडे, विजय थोरात, भानुदास बटवाल, सुधीर चिखले, निलम आल्हाट, सुनीता खेबडे, नामदेव तळपे, विशेष शिक्षिका स्वाती पडवळ यांसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

तज्ज्ञ मार्गदर्शक रोहिदास सोनावणे यांनी वाचन आकलन तंत्रांबाबत मार्गदर्शन केले, तर तुषार शिंदे यांनी मापनातील प्रमाणित व अप्रमाणित एकके तसेच आनापान ॲप याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांकडून गटकार्य, चर्चा व गटकार्याचे सादरीकरण करून घेण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख सीमा कहडणे म्हणाल्या, “आजच्या एआय युगात शिक्षकांनी आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. परसबागेमुळे कळंब शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग, शेती आणि पर्यावरणाचे प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण मिळत आहे. विद्यार्थ्यांची वाचनातील अचूकता सुधारून वाचनवेग वाढवण्यासाठी वाचनध्यास कृती कार्यक्रमाची शिक्षकांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिक्षकांनी निपुण महाराष्ट्रची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थी व शाळा निपुण होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच शाळेत माता-पालक मेळाव्याचे आयोजन करून पालक व विद्यार्थ्यांना आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शन करावे.”

दरम्यान, कळंब प्राथमिक शाळेला इयत्ता दहावी बॅच १९९३ कडून दहा फॅन व साऊंड सिस्टीम उपलब्ध करून देण्यात आली. तसेच कै. महादू रामभाऊ कानडे व कै. सावित्रीबाई महादू कानडे यांच्या स्मरणार्थ कानडे परिवाराकडून इंटरएक्टीव्ह बोर्ड देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. याबद्दल राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे व शिक्षक विकास कानडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच ग्लोबल टीचर सचिन पालेकर आणि शाळा स्तरावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिष्यवृत्ती, इस्रो, नासा परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करणारे मुख्याध्यापक व शाळाप्रमुख यांचाही सत्कार करण्यात आला. कळंब शाळेतील शालेय परसबागेत उत्पादित मेथीच्या भाजीची जुडी, शाल व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
शिक्षण परिषदेचे नियोजन शिक्षिका सुनिता चास्कर व गीतांजली शेलार यांनी केले. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक शिक्षक गणेश लोहकरे यांनी केले. स्वागत बाळासाहेब कानडे यांनी केले, तर आभार संतोष कानडे यांनी मानले.

कळंब (ता. आंबेगाव) येथील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत शिक्षकांना मार्गदर्शन करताना चांडोली बुद्रुक केंद्राच्या केंद्रप्रमुख सीमा कहडणे.

कळंब (ता. आंबेगाव) येथील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत गटकार्याचे सादरीकरण करताना शिक्षकवृंद.
