
पंचनामा प्रतिनिधी – आज शिरदाळे येथे धुलिवंदनाच्या निमित्ताने वीरांची मिरवणुक पारंपारिक पद्धतीने अतिशय उत्साहात संपन्न झाली.
यावर्षी चंद्रग्रहण असल्यामुळे हा कार्यक्रम सकाळी १० वा.संपन्न झाला.गावातील लहान मुलांना तसेच तरुण मुलांना वीर देव म्हणून सजवले जाते.गळ्यात आणि पायात चाफ्याच्या फुलांचा हार,साडीने कमरेला केलेली सजावट तसेच डोक्यावर फेटा गळ्यात सोन्याचा अलंकार आणि हातात वीर देव आणि काठी तर संपूर्ण अंगावर गंधाचे ठसे असा पेहराव वीरदेवांचा केला जातो.

घरातील एक वीर देव पारंपरिक वाद्याच्या जयघोषात गावच्या मुख्य चौकात आणले जातात.त्याठिकाणी महिलांनी पाण्याने गोल राउंड तयार केलेला असतो.(हेल घालणे) त्यामागचा उद्देश म्हणजे वीर देव अनवाणी असल्यामुळे त्यांना उन्हापासून नाचताना बचाव व्हावा हा असावा.त्याठिकाणी वीर देवांना नाचवले जाते.त्यांच्याबरोबर गावातील जेष्ठ आणि तरुण मंडळी घाई धरून नाचत असतात यामुळे संपूर्ण वातावरण अतिशय पारंपारिक होऊन जात असते.

त्यानंतर ती मिरवणूक मुख्य चौकातून मारूतीचे दर्शन घेऊन तळ्यावरील महादेव मंदिर व होळीला प्रदक्षिणा घालून पुन्हा मुख्य चौकात आणली जाते.त्याठिकाणी पुन्हा सर्व देवांना नाचवले जाते आणि नंतर प्रत्येक जण आपला देव खांद्यावर घेऊन आपापल्या घराच्या अंगनात बसवला जातो.गावातील महिला त्या देवांना ओवाळून त्यांचे पाय धुतले जातात तसेच त्यांना गोड प्रसाद भरवला जातो.त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता केली जाते.
गेली शेकडो वर्षांची असलेली परंपरा आजही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन संपन्न करत असतात.यातून गावातील सर्व ग्रामस्थ महिला एकत्र येऊन हा सण साजरा करत असतात त्यामुळे गावचा एकोपा तसेच या सणांचे महत्व अधिक टिकून आहे.बाहेर गावाला राहायला गेलेली मंडळी तसेच शहरातील मंडळी देखील या सणाला आवर्जून येत असतात.
ग्रामीण भागातील या सणांमुळे आपली परंपरा आणि संस्कृती टिकून असून हे सण आणि त्यांचे महत्व जपणे खूप गरजेचे आहे.
यावेळी अनेक जेष्ठ मंडळींनी ताशाच्या आणि सनईच्या तालावर घाई धरून जुन्या पद्धतीने घाई धरली.यात कोंडीभाऊ तांबे,गेनभाऊ रणपिसे,शंकर तांबे,संभाजी सरडे,प्रभाकर तांबे,रामचंद्र रणपिसे,बाळू चौधरी,मच्छिंद्र चौधरी यांनी यात सहभाग घेतला.तर अनेक ग्रामस्थानी रोख रक्कम वाजंत्री मंडळींना ओवाळणी म्हणून देखील दिली.अतिशय सुंदर सोहळा हा संपन्न झाला.यावेळी गावातील सर्व ग्रामस्त,महिला मोठया संखेने उपस्थित होते.

खर तर ग्रामीण संस्कृती आणि परंपरा आता लोप पावत चालल्या आहेत परंतु आमच्या शिरदाळे सारख्या ग्रामीण भागात आजही या परंपरा जपल्या जातात.यातून पारंपरिक सणांचे महत्व येणाऱ्या पिढीला कळावे तसेच ते टिकवणे हे महत्वाचे असते.आम्ही ग्रामस्थ मंडळी सर्वच पारंपरिक सण अशा पद्धतीने साजरे करत असतो.यातून आमचे ग्रामस्थ एकत्र येतात आणि सर्व विसरून धुळवडीचा आनंद घेतात.या सर्व परंपरा जपण्याचा आमचा प्रयत्न असतो असे श्री.मयूर सरडे (मा.उपसरपंच शिरदाळे) यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.



