सामाजिक

महिमा थोर वाढेल तुमचा ; धामणी येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाच्या शताब्दी महोत्सवात ह.भ.प. माऊली महाराज कदम यांची सहावी पुष्पसेवा !!

img 20260904 wa0788

पंचनामा प्रतिनिधी – श्रीकृष्ण जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात आळंदी येथील ह.भ.प. श्री. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांनी सहावी पुष्पसेवा गुंफली. त्यांच्या ओघवत्या वाणीतील कीर्तनाने उपस्थित भाविक अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाले.

‘छोटे माऊली’ ही उपाधी त्यांना कशी मिळाली, याची उत्सुकता या कीर्तनातून शमली. अल्पवयातच लाभलेली अगाध ज्ञानसाधना, मधुर वाणी आणि विठ्ठलभक्तीतील लीनता यामुळे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी व भाविकांनी त्यांना आदराने ‘छोटे माऊली’ ही उपाधी दिली. वारकरी संप्रदायातील लोकप्रिय तसेच तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख आहे.

अध्यात्मासारखा गंभीर विषय अत्यंत सोप्या भाषेत, दैनंदिन जीवनातील मजेशीर उदाहरणे देत त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. विनोदी आणि भावपूर्ण शैलीने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. आजच्या काळातील व्यसने, कौटुंबिक नातेसंबंध व आरोग्य यावर त्यांनी रोखठोक भाष्य केले. मात्र, हे करताना वारकरी संप्रदायाची मूळ चौकट, परंपरा व नियम यांची कास त्यांनी सोडली नाही, हे त्यांच्या कीर्तनाचे वैशिष्ट्य ठरले.

‘प्रताप तुमचा आहेचि जैसा…’ अभंगाचे निरूपण

कीर्तनासाठी त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना गुरू मानणारे गुरुभक्त संत निळोबाराय यांचा अभंग निवडला—

‘प्रताप तुमचा आहेचि जैसा ।
करितां जी तैसा बडिवारही ॥
नव्हे जें कोणा तें करुनी दावितां ।
अघटित घडवितां निमिष्यमात्रे ॥
स्त्रियांचे पुरुष पशुमुखें श्रुती ।
चालविल्या भिंती उदकीं वह्या ॥
निळा म्हणे माझा करा अंगिकार ।
तरी महिमा थोर वाढेल तुमचा ॥’

या अभंगाचे यथार्थ निरूपण करताना छोटे माऊली यांनी कमीपणा आणि मोठेपणा यामधील अंतर तसेच मोठेपणा कसा प्राप्त होतो, याचा आलेख मांडला. मोठेपणा मिळवायचा असेल तर गुण, सापेक्षता आणि महिमा यांचा अंगीकार आवश्यक असल्याचा उपदेश त्यांनी विविध उदाहरणांसह केला.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळे, धामणखिंड, केंदूर घाट आणि आळंदी येथील प्रवास व वास्तव्यासंदर्भातील दाखले त्यांनी दिले. संत तुकाराम महाराजांचे धामणीतील कार्य तसेच चांगदेव महाराजांचा धामणीमार्गे झालेला प्रवास याचेही वर्णन त्यांनी कीर्तनातून केले.

संतांचा सहवास लाभलेल्या धामणी गावात गुरुवर्य ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे यांनी वारकरी परंपरा रुजवून ती वाढवली. ज्ञानेश्वरी मंदिर असो किंवा गाथा मंदिर, ते उभे करण्याची जगातील पहिली संकल्पना केंद्रे यांची असल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही छोटे माऊली यांनी केला. मठाधिपती ह.भ.प. विष्णू महाराज केंद्रे आणि आपण एकाच शाळेतील विद्यार्थी व वारकरी असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

भाविकांच्या गर्दीने गाठला उच्चांक

अखंड हरिनाम सप्ताहाच्या शताब्दी महोत्सवातील सहाव्या दिवशी भाविकांच्या उपस्थितीने गर्दीचा उच्चांक गाठला. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, पारनेर व हवेली या तालुक्यांतून वारकरी संप्रदायातील अनेक नामवंत कीर्तनकार व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाराभाऊ बलुतेदार बांधवांनी भक्तिभावाने केलेल्या पारंपरिक मासवडीच्या महाप्रसादाचा आस्वाद घेत भाविकांनी सहाव्या दिवसाच्या पर्वाची सांगता केली. शताब्दी महोत्सवातील हा कीर्तन सोहळा अद्वितीय ठरला असून, त्याची भक्तिरसपूर्ण अनुभूती प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत आहे.

महोत्सवाचे नियोजन आणि त्याची झालेली फलश्रुती धामणी, शिरदाळे, पहाडदरा व ज्ञानेश्वरवस्ती येथील ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

1010806600
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

पारगावच्या तरुणांची भीमाशंकर देवस्थान सायकल वारी ; धार्मिक श्रद्धेला व्यायाम व पर्यावरण संवर्धनाची जोड !!

Chief Editor

जलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन ; २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण जनजागृती पदयात्रा’; पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे !!

Chief Editor

चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप !!

Chief Editor

Leave a Comment