
शिरदाळे (प्रतिनिधी) : वृक्षवल्ली आम्हा सोयरे मित्र परिवार, शिरदाळे यांच्या वतीने रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी आयोजित वृक्षारोपण व सन्मान सोहळा उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ, जांभूळ, करंज, कांचन, नारळ व उंबर या देशी प्रजातींच्या ७० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा या उद्देशाने अडुळसा, इन्सुलिन व कढीपत्ता या औषधी वनस्पतींची ३० रोपे मान्यवर व ग्रामस्थांना भेट देण्यात आली.

त्यानंतर गावातील मंदिरात आयोजित सन्मान सोहळ्यात शिरदाळे गावाचे कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबा प्रकटस्थान, सागदरा येथील जीर्णोद्धार व सुशोभीकरण कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ग्रामस्थांचा ३० औषधी रोपे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन व सामाजिक एकोपा याविषयी मार्गदर्शन केले.

याच कार्यक्रमात वृक्षवल्ली परिवारासाठी आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली. शिरदाळे गावाचे सुपुत्र तथा सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेले AI विषयातील PhD धारक डॉ. संकेत सुभाष काचोळे यांनी संस्थेच्या कार्याची दखल घेत ₹५०,००० ची आर्थिक मदत संस्थेच्या खात्यात जमा केली. तसेच गावातील उद्योजक व कंत्राटदार श्री. मनोज बारकू तांबे यांनी ₹१०,००० चा धनादेश संस्थेला सुपूर्द केला. याशिवाय कै. रामदास तुळशीराम तांबे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी व आप्तेष्टांनी ₹४,५०० ची देणगी देऊन सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला. अशा प्रकारे संस्थेला एकूण ₹६४,५०० ची आर्थिक मदत प्राप्त झाली.

ही मदत केवळ आर्थिक नसून गावकऱ्यांचा, गावाबाहेर राहणाऱ्या बांधवांचा आणि समाजाचा वृक्षवल्ली परिवारावरील दृढ विश्वास असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या निधीतून भविष्यात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण तसेच गावहिताचे विविध सामाजिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमास श्री. अक्षय बोराडे (संस्थापक अध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्र), श्री. बाबाजीशेठ चासकर (अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठान महाराष्ट्र), श्री. यादवशेठ चासकर, श्री. विठ्ठलराव जाधव (उपसंपादक, दैनिक सामना), श्री. अंकुश भूमकर (सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार), धामणीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री. सागर जाधव तसेच श्री. चंद्रकांत जाधव (सामाजिक कार्यकर्ते) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे मित्र परिवारातील सुमारे ४० सदस्यांनी दिवसभर परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप सुरेश तांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वृक्षवल्ली आम्हा सोयरे संस्थापक श्री. सुशांत राजू तांबे यांनी केले.

यावेळी संतोष रणपिसे, शंकर तांबे, अशोक तांबे, सुभाष काचोळे, गोरक्ष तांबे, रामदास तांबे, राजू तांबे, संजय तांबे, गणेश तांबे, भूषण तांबे, संकेत तांबे, स्वप्नील तांबे, आकाश दौंडकर, सचिन तांबे, श्रीनाथ तांबे, कुणाल तांबे, साहिल तांबे, कल्पेश सरडे, शिवाजी सरडे, बाळासाहेब रणपिसे, बाळासाहेब तांबे, तेजस रणपिसे, सुजल रणपिसे, संदेश तांबे, दत्ता रणपिसे, मनोज तांबे, बजरंग तांबे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, देणगीदार, ग्रामस्थ, वृक्षवल्ली परिवारातील सदस्य तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. “झाडे लावूया, झाडे जगवूया, निसर्ग वाचवूया, समाज घडवूया” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. 🌳🌿



