
मंचर : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत देवस्थान मंदिराच्या महाद्वारासमोर लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या नवीन दगडी दीपमाळीच्या बांधकामाचा शुभारंभ रहाटणी (पिंपरी-चिंचवड) येथील उद्योजक किरण श्रीकांत खुळे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ११ सप्टेंबर) करण्यात आला. याबाबतची माहिती ग्रामस्थ व सेवेकरी मंडळींनी दिली.
पुरातन खंडोबा मंदिर परिसरात यात्रोत्सवाच्या वेळी भाविकांना दीपप्रज्वलन करता यावे, यासाठी नवीन दीपमाळ उभारण्यात यावी, अशी सूचना ह. भ. प. प्रसाद महाराज अमळनेरकर यांनी ग्रामस्थांना केली होती. त्यानुसार लोकसहभागातून या दीपमाळीचे बांधकाम करण्यात येत आहे.

नवीन दीपमाळ आकर्षक दगडी अष्टकोनाकृती असून तिची उंची २१ फूट असणार आहे. दीपमाळीची रचना व शिल्पकाम शिल्पकार कैलास माने (चाकण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपमाळेचे महत्त्व
दीपमाळ ही प्रामुख्याने कुलदैवत, कुलदेवता व ग्रामदैवताच्या मंदिरासमोर तसेच मंदिराच्या प्रांगणात आढळणारा पारंपरिक वास्तुकलेचा सुंदर स्तंभ आहे. दीपमाळेला दीपस्तंभ किंवा दीपज्योती स्तंभ असेही म्हटले जाते.
मराठेशाहीच्या काळात पारंपरिक प्रथेनुसार अनेक सरदार, राजे व श्रीमंत व्यक्ती मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी खंडोबा मंदिर परिसरात दीपमाळ उभारत असत. दीपमाळेचा आकार गोल, षटकोनी किंवा अष्टकोनी असू शकतो. तळाशी रुंद आणि वर जाताना निमुळती होत जाणारी दीपमाळ ही वैशिष्ट्यपूर्ण असते.

दीपमाळेच्या खांबावर दिवे ठेवण्यासाठी लहान कोनाडे (देवळ्या) किंवा बाहेरील बाजूस तुळ्या (शाखा) केलेल्या असतात. सर्वांत वर मोठा खोलगट दिवा असतो. या कोनाड्यांमध्ये किंवा तुळ्यांवर तेलाचे दिवे लावले जातात. वरच्या भागात कापूर व गुग्गुळासारखे ज्वालाग्राही पदार्थ ठेवून ते प्रज्वलित केले जातात. त्यामुळे उंचावरून दीपमाळेचा प्रकाश मंदिर परिसरात दूरवर पसरतो.
जेजुरी गड व मंदिर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ३५० पेक्षा अधिक लहान-मोठ्या दगडी नवसाच्या दीपमाळा आहेत. दिवाळी, देवदिवाळी, त्रिपुरा पौर्णिमा, चंपाषष्ठी, सोमवती तसेच यात्रोत्सवाच्या वेळी या दीपमाळा श्रद्धेने प्रज्वलित केल्या जातात.

दीपमाळ ही केवळ प्रकाशाचे साधन नसून गावाच्या आणि देवस्थानाच्या वैभवाचे प्रतीक मानले जाते, असे संत साहित्याचे अभ्यासक सुरेश भावे (पुणे) यांनी सांगितले.



