
पंचनामा प्रतिनिधी – समालखा, २६ ऑक्टोबर २०२६ :- “प्रत्येक परिस्थितीत परमात्म्याच्या प्रेमात स्थिर राहणे हीच खरी जागृती आहे.” हे दिव्य उद्गार निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या तिसऱ्या दिवशी आपल्या दिव्य प्रवचनातून व्यक्त केले. समालखाच्या पावन भूमीवर देश-विदेशातून सहभागी झालेल्या लाखो श्रद्धाळूंच्या उपस्थितीने प्रेम, श्रद्धा आणि एकत्वाचे अनुपम दृश्य साकारले. सद्गुरूंच्या पावन दर्शनाने श्रद्धाळू भावविभोर झाले असून, संपूर्ण वातावरण भक्ती, समर्पण आणि आत्मिक आनंदाने उजळून निघाले. गुरु आणि गुरसिख यांचा हा पावन मिलाप प्रेम, मानवता आणि विश्वबंधुत्वाची भावना साकार करताना दिसून आला.




सद्गुरू माताजींनी श्रद्धाळू भक्तांना आशीर्वाद देताना सांगितले की, आत्म्याचे परमात्म्याशी मिलन आणि प्रत्येक क्षणी निराकार प्रभूचा अनुभव घेणे हाच आध्यात्मिक जीवनाचा सार आहे. परमात्मा अटल सत्य आहे; मात्र आपल्या इच्छा आणि परिस्थिती सतत बदलत असतात. अनुकूल परिस्थितीत श्रद्धा कायम ठेवणे सोपे असते; परंतु प्रत्येक परिस्थितीत अढळ राहणारी भक्ती हीच खरी भक्ती आहे.

माताजींनी पुढे सांगितले की, ब्रह्मज्ञानातून प्राप्त झालेली जागृती आपल्याला संपूर्ण जीवनभर सजग आणि सचेत राहण्याची प्रेरणा देते. ही जागृती आपल्या वर्तनात, निर्णयांमध्ये तसेच सामाजिक जीवनातही स्पष्टपणे दिसून आली पाहिजे. अन्यायाविरुद्ध उभे राहताना आपल्या उद्देशाचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे—आपला प्रयत्न खरोखरच कल्याणासाठी आहे की अहंकार, स्वार्थ आणि दिखाव्यासाठी? विचारांमध्ये मतभेद असले तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्म्याचा अंश पाहून त्याचा स्वीकार करणे हीच निष्काम प्रेमाची खरी ओळख आहे.

सद्गुरू माताजींच्या दिव्य प्रवचनापूर्वी निरंकारी राजपिता रमित जी यांनी जागृतीचा संदेश देताना स्पष्ट केले की, जीवनात ज्या ठिकाणी परिवर्तन शक्य आहे, तेथे सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत आणि ज्या परिस्थितीत परिवर्तन शक्य नाही, त्या परिस्थितीचा सहजतेने स्वीकार करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे.

राजपिता जी यांनी पुढे सांगितले की, मनुष्य आपल्या सांसारिक गरजा आणि भौतिक सुख-सुविधांबाबत सजग असतो; मात्र अनेकदा आपल्या आत्म्याची खरी तहान दुर्लक्षित करतो. परमात्म्याच्या प्रेमाची आणि त्याच्या सर्वव्यापकतेची जाणीव ठेवणे, अहंकाराचा त्याग करणे तसेच खरी जिज्ञासा, श्रद्धा आणि समर्पणभावाने जीवन जगणे हीच वास्तविक आध्यात्मिक जागृती आहे.

या पावन प्रसंगी हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री श्री. नायब सिंह सैनी यांनी सद्गुरूंचे पावन आशीर्वाद प्राप्त केले. तसेच अनेक नगरसेवक आणि आमदारांनीही सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांचे पावन दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला.

दिव्यांग संत-महात्म्यांसाठी विशेष व्यवस्था :
समागमामध्ये दिव्यांग संत-महात्म्यांच्या सुविधेसाठी सर्व प्रवेशद्वारांवर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना समागम स्थळी सहजपणे पोहोचता येत आहे. त्यांच्या निवासाची, भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुख्य कार्यक्रमांचे दर्शन घेण्यासाठी एलईडी स्क्रीनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय समागमादरम्यान त्यांना सद्गुरूंच्या पावन दर्शनाचा लाभही मिळत आहे.

कायरोप्रॅक्टिक शिबिर आणि आरोग्य सेवा :
समागमामध्ये मिशनच्या आरोग्य व समाजकल्याण विभागाच्या वतीने व्यापक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समागम परिसरात ८ अँलोपॅथिक आणि ६ होमिओपॅथिक दवाखाने, १५ प्राथमिक उपचार केंद्रे, एक कायरोप्रॅक्टिक शिबिर तसेच १५ आयसीयू सुविधांसह १२० खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले आहे. आपत्कालीन सेवांसाठी मिशनच्या १२ आणि हरियाणा सरकारच्या ३० रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यापैकी १५ रुग्णवाहिका व्हेंटिलेटरयुक्त आहेत.
समागमादरम्यान कायरोप्रॅक्टिक शिबिरामध्ये भारत तसेच विदेशातील तज्ज्ञ डॉक्टर आपली सेवा देत आहेत. या निःस्वार्थी आरोग्यसेवेचा हजारो अस्वस्थ व्यक्तींनी लाभ घेतला आहे. याशिवाय कान-नाक-घसा (ईएनटी), नेत्ररोग, बालरोग, दंतचिकित्सा आणि मानसोपचार यांसह विविध क्षेत्रांतील वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने श्रद्धाळूंना व्यापक आणि अचूक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

लंगर आणि कॅन्टीन व्यवस्था :
समागम परिसरात चार ठिकाणी सामुदायिक भोजन अर्थात लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे लाखो श्रद्धाळूंना दिवसरात्र भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्वजण एकत्र बसून लंगर ग्रहण करत असताना ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना प्रत्यक्षात साकार झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. याशिवाय २२ कॅन्टीनमध्ये सवलतीच्या दरात अल्पोपहार, चहा, कॉफी आणि मिनरल वॉटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुनियोजित व्यवस्थेमुळे श्रद्धाळूंची सुविधा सुनिश्चित होण्याबरोबरच सेवा, समानता आणि सहकार्याची भावनाही अधोरेखित झाली आहे.




