
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हे-बांगरवाडी येथील विद्यार्थिनी इशिता काकडे हिने नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत ओपन साईट प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. या शानदार कामगिरीच्या जोरावर तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
इशिता हिने अचूक नेमबाजी आणि कौशल्याच्या जोरावर हे यश मिळविले. तिच्या या यशासाठी क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी आणि किशोर काकडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
इशिताच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
इशिताच्या या यशामुळे समर्थ शैक्षणिक संकुलाच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली असून, तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


