
पंचनामा प्रतिनिधी – दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे शुक्रवार (ता. ३०) कारखान्याचे संस्थापक-संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर सकाळी ठिक १०.०० वाजता भीमाशंकर साखर कारखाना व भीमाशंकर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवनेरी ब्लड सेंटर, मंचर यांचेमार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.



सद्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांसमोर विविध अडचणी उभ्या राहत आहेत. अशा परिस्थितीत समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून व रक्तदान हे जीवनदान असून गरजू रूग्णांना रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताची गरज असणा-या गरजूंना रक्त वेळेत उपलब्ध व्हावे हा मुख्य उद्देश आहे. वाढदिवसानिमित्त केक, हारतुरे, फटाके बॅनरवर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी, गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी, पाणीटंचाई निवारणासाठी प्रयत्न करावेत. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील तरुणांनी, नागरीकांनी व रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.


