
पंचनामा प्रतिनिधी – पारगाव शिंगवे (ता.आंबेगाव) येथील तिघा तरुणांनी कडक उन्हाची तमा न बाळगता सायकलवारी करत भक्ती आणि जिद्दीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे.श्री विठ्ठल ढोबळे (मा. उपसरपंच,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पारगाव) श्री गणेश भागवत व श्री भरत ढोबळे हे तिघे जण पारगाव ते आळंदी, दिवेघाट मार्गे पंढरपूर आणि पुढे अक्कलकोट असा सायकल प्रवास करत आहेत.विशेष म्हणजे,संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा ज्या मार्गाने जातो, त्याच मार्गाने सायकलवारी करण्याचा निश्चय या तिघांनी केला आहे. त्यामुळे या प्रवासाला अधिक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या सायकलवारीदरम्यान भाविकांनी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले असून पुढील प्रवास “राम कृष्ण हरी” च्या जयघोषात सुरू आहे. कडक उन्हातही सातत्याने सायकल चालवत त्यांनी जिद्द आणि श्रद्धेचे दर्शन घडवले आहे.या प्रवासासाठी आवश्यक बॅग, कपडे, पिण्याचे पाणी व बिछान्याची व्यवस्था व्हॅगनर गाडीमधून करण्यात येत असून या सेवेसाठी श्री अशोक ढोबळे हे चालक म्हणून साथ देत आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे सायकलवारी अधिक सुलभ होत आहे.

या उपक्रमातून “इंधन वाचवा, सायकल चालवा” हा पर्यावरणपूरक संदेश देण्यात येत असून तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला जात आहे.संपूर्ण प्रवास अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून या सायकलवारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



