सामाजिक

मायेची उब व माणुसकीचा फराळ’ उपक्रमातून १२ आश्रमांमध्ये माणुसकीची दिवाळी

1011626324
1011626321

पंचनामा प्रतिनिधी निगडी : दिवाळीच्या सणानिमित्त समाजातील वंचित घटकांच्या जीवनात प्रेम, आपुलकी आणि आनंदाचे क्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘मायेची उब व माणुसकीचा फराळ’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. १ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत शहर व परिसरातील एकूण १२ आश्रमांना भेट देऊन बालके, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

२०२२ पासून दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय सेवा योजना पुणे शहर विभागाचे समन्वयक प्रा. रोहित गुरव आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. सत्यवान कुंभार यांच्या नियोजनातून हा उपक्रम पार पडला. यावेळी आश्रमातील रहिवाशांना दिवाळीचा फराळ, कपडे, फळे, किराणा साहित्य, फटाके व स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. तसेच विविध खेळ, गाणी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले.

आश्रमातील बालकांसोबत आनंदाची दिवाळी

१ नोव्हेंबर रोजी ओमशांती मुलींचा आश्रम, चिखली; स्नेहछाया, दिघी; मातृछाया बालाश्रम, दिघी आणि ज्ञानदीप बालगृह, दिघी येथे भेट देण्यात आली. ओमशांती आश्रमातील मुलींसोबत स्वयंसेवकांनी गाणी गायली, विविध खेळ खेळले आणि फराळ, कपडे व फळांचे वाटप केले. स्नेहछाया आश्रमातील मुलांनी स्वयंसेवकांसोबत खेळ खेळत आपले अनुभव सांगितले. मातृछाया बालाश्रमातील मुलांनी नृत्य व योगाची प्रात्यक्षिके सादर केली, तर ज्ञानदीप बालगृहातील लहान मुलांनीही योग व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

२ नोव्हेंबर रोजी शिवशक्ती स्पंदन बालाश्रम, थेरगाव; इमॅन्युएल बालाश्रम, थेरगाव आणि अन्नपूर्णा आश्रम, आळंदी येथे भेट देण्यात आली. यावेळी मुलांसोबत विविध मनोरंजक खेळ खेळण्यात आले. फराळाचे वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद अन् आठवणींना उजाळा

३ नोव्हेंबर रोजी सावली होम्स, पिंपरी; मायेची सावली, किवळे आणि स्वर्णविहार, पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. स्वयंसेवकांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत गाणी गायली, नृत्य केले आणि विविध खेळ खेळले. त्यांना फराळ, कपडे व फळांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जीवनातील आठवणी व अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. तरुण स्वयंसेवकांच्या सहवासामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले.

४ नोव्हेंबर रोजी आनंदघन वृद्धाश्रम, मोशी येथे भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव व आठवणी सांगितल्या.

1011626324

मध्यरात्री रस्त्यावर झोपणाऱ्यांना ब्लँकेटची ऊब

या उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत स्वयंसेवकांनी मध्यरात्री आकुर्डी, चिंचवड, भोसरी स्टेशन तसेच आळंदी मंदिर परिसर व घाट येथे उघड्यावर झोपणाऱ्या गरजू व्यक्तींना थंडीपासून संरक्षण मिळावे, यासाठी ब्लँकेट पांघरून मायेची ऊब दिली.

५ नोव्हेंबर रोजी निर्मल बालविकास संस्था, ठाकूर पिंपरी येथे भेट देऊन फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले. या भेटीने पाच दिवसीय उपक्रमाची सांगता झाली.

मराठवाड्यातील १०० कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

या उपक्रमासाठी समाजातून आर्थिक स्वरूपात मदत मिळाली असून, त्यातून जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील १०० कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. रोहित गुरव यांनी दिली. उपक्रमाचा पुढील टप्पा दुष्काळग्रस्त भागांमध्ये राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमादरम्यान महाविद्यालयाकडून डॉ. सत्यवान कुंभार, प्रा. आरती शिंगण आणि डॉ. अक्षया मेहेर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण दिगंबर चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी महाविद्यालयाचा सक्रिय पाठिंबा मिळाला. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. यापुढेही हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविण्यात येईल, असे आश्वासन प्राचार्य डॉ. पी. डी. चौधरी यांनी दिले.

पाच दिवसांच्या या उपक्रमातून स्वयंसेवकांनी केवळ वस्तूंचे वाटप न करता प्रेम, आपुलकी, संवाद आणि सहवासाच्या माध्यमातून दिवाळीचा खरा आनंद आश्रमातील रहिवाशांपर्यंत पोहोचविला. माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपणारा हा उपक्रम समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठरला.

1011605850

Related posts

निरगुडसरच्या प्रतीक कडलकची या युवा क्रिकेटपटूची १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड ; आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा !!

Chief Editor

लोणी वाफगाव घाटात अती पावसाने झाडे आणि मातीचा मलबा कोसळला !!

Chief Editor

पंचायत समिती चांदवड व ग्रामपंचायत अधिकारी संघटना (DNE- 136) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment