
पंचनामा प्रतिनिधी जारकरवाडी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जारकरवाडी येथे मंगळवार (दि. १० नोव्हेंबर २०२६) रोजी सकाळी ११ वाजता माजी विद्यार्थी मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेत शिक्षण घेतलेल्या विविध क्षेत्रांतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शाळेच्या विकासासाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेचे संचालक खंडू शेठ भोजने, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजने, महिला आघाडी जिल्हा संघटक ॲड. रूपालीताई भोजने, तहसीलदार (भूम-परांडा) निलेश काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय लांभाते, सीए संकेत चासकर, अधिव्याख्याता रुपेश लबडे, पत्रकार (मुंबई) संतोष वाव्हळ, मनपा अधिकारी संतोष लबडे सर, शरद पतसंस्थेचे उपाध्यक्ष रवीशेठ काकडे, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष काळूराम टाव्हरे, खरेदी-विक्री संघाचे मा. संचालक शिवाजी नाना भोजने, माजी उपसरपंच कौसल्याताई भोजने, सोसायटीचे सचिव नवनाथ मंचरे, उद्योजक पप्पू शेठ भोजने, युवा उद्योजक बाबाजीशेठ देवडे, मा. विजय भांड, मुख्याध्यापक शिवाजी चासकर आणि गोरक्ष उकिरडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेचे संचालक खंडूशेठ भोजने यांची सहकार देखरेख संघावर संचालकपदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संकेत चासकर यांनी सीए पदवी संपादन केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

तहसीलदार निलेश काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय लांभाते, सेवानिवृत्त अधिकारी डी. डी. भोजने, रुपेश लबडे सर,संतोष लबडे (मनपा) आणि म. वी. काळे सर (केंद्रप्रमुख, पारगाव) यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयीच्या आठवणी सांगत कृतज्ञता व्यक्त केली. शाळेने दिलेल्या शिक्षणामुळेच आज विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. केवळ आठवणींना उजाळा देण्यापुरता हा मेळावा मर्यादित न राहता शाळेच्या विकासासाठी एकत्रितपणे योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी चासकर सर यांनी केले. सूत्रसंचालन अब्दुल इनामदार सर यांनी केले, तर आभार गोरक्ष उकिरडे सर यांनी मानले.

माजी विद्यार्थ्यांच्या एकजुटीतून शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची आशा या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने व्यक्त झाली.


