
पंचनामा प्रतिनिधी – खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावठाण अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘आनंदवारी ग्रंथ दिंडी व पालखी सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
‘ग्रंथ हेच गुरु’ या संकल्पनेला अनुसरून विद्यार्थ्यांनी ग्रंथपालखी खांद्यावर घेत ‘वाचाल तर वाचाल’ हा वाचन संस्कृतीचा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचवला.
अभंग, गवळणी, भजन, कीर्तन आणि हरिनामाच्या गजरात विठ्ठल-रुक्मिणी तसेच विविध संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या निनादात संपूर्ण गावातून दिंडी काढत भक्तिमय वातावरण निर्माण केले.
दिंडीदरम्यान गावातील सुहासिनींनी विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे औक्षण व पूजन करून स्वागत केले. या उपक्रमास खडकवाडी येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळाने विशेष सहकार्य केले.
यावेळी इयत्ता तिसरीतील विद्यार्थी कौस्तुभ बोऱ्हाडे याने प्रभावी कीर्तन सेवा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

