कै. दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगरूळमध्ये दोन दिवसीय तमाशा महोत्सव ; १३ व १४ नोव्हेंबरला रंगणार लोककलेचा जागर; सहा तमाशा कार्यक्रमांचे आयोजन !!

पंचनामा प्रतिनिधी मंगरूळ – महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपणारे ज्येष्ठ लोककलावंत, ‘संगीतरत्न’ कै. दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथे १३ व १४ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य दोन दिवसीय तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कै. दत्ता महाडिक यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या महोत्सवामागे आहे. कै. दत्ता महाडिक यांचे चिरंजीव संजय महाडिक यांनी याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत तमाशा कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गण, गवळण, बतावणी, सवाल-जवाब, लावणी आणि वगनाट्य अशा विविध कलाप्रकारांनी समृद्ध असलेल्या या लोककलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी महोत्सवाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. दोन दिवसांत एकूण सहा तमाशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रसिकांना पारंपरिक तमाशा कलेचा आनंद अनुभवता येणार आहे.

या महोत्सवाला महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत, राजकीय क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, तमाशा कलावंत, ज्येष्ठ व युवा लोककलावंत तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींची उपस्थिती लाभणार आहे.
तमाशा ही केवळ मनोरंजनाची कला नसून महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे, परंपरेचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. या कलेतील पारंपरिक सादरीकरण, लोकसंगीत आणि लावणीच्या माध्यमातून रसिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची अनुभूती मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील तमाशाप्रेमी आणि लोककला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन कै. दत्ता महाडिक यांचे कुटुंबीय आणि मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


