
योग्य मशागत, खतांचे संतुलित नियोजन आणि वेळेवर पाणीपुरवठ्यामुळे उसाची जोमदार वाढ ; भीमाशंकर कारखान्याच्या मार्गदर्शनाचाही फायदा
पंचनामा प्रतिनिधी – जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक विलास जालिंदर लबडे यांच्या शेतातील आडसाली उसाने परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या शेतात सध्या ऊसतोड सुरू असून, २६५ वाणाच्या एका उसाला तब्बल ७० कांडी फुटल्याने परिसरातील ऊस उत्पादकांमध्ये या उसाची विशेष चर्चा रंगली आहे.
विलास लबडे यांनी आपल्या शेतात २६५ वाणाच्या आडसाली उसाची लागवड केली होती. लागवडीपासूनच पिकाची योग्य मशागत, खतांचे संतुलित नियोजन, वेळेवर पाणीपुरवठा आणि पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष दिल्याने उसाची वाढ जोमदार झाली. सध्या शेतात ऊसतोड सुरू असून, उसाचे गाळपही चांगल्या पद्धतीने होत आहे.
ऊस लागवडीनंतर योग्य व्यवस्थापन, संतुलित खत मात्रा, अनुकूल वातावरण आणि वेळेवर पाणीपुरवठा या बाबींकडे विशेष लक्ष दिले. त्याचबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे नियोजन व मार्गदर्शन यांचाही फायदा झाला. या सर्व बाबींमुळे उसाची चांगली वाढ होऊन उत्पादनात वाढ झाल्याचे ऊस उत्पादक प्रवीण लबडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मार्गदर्शनासह प्रोत्साहन –
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून एकरी ऊस उत्पादनात वाढ कशी करता येईल, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर व्याख्याने व मेळावे आयोजित केले जात आहेत. एकरी सर्वाधिक ऊस टनेज मिळविणाऱ्या शेतकऱ्यांचा कारखान्याच्या वतीने सन्मान केला जातो. तसेच खोडवा उसासाठी अनुदान देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.
कारखान्याचे माजी संचालक विलास लबडे यांच्या शेतात उसाला ७० कांडीपर्यंत वाढ मिळाली असून, त्यांच्या मेहनतीचे हे फलित आहे. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन आणि आधुनिक शेती व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास एकरी ऊस उत्पादनात निश्चितच वाढ होऊ शकते, असे मत भीमाशंकर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे यांनी व्यक्त केले.
जारकरवाडीतील हा ऊस परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, मेहनत, योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाच्या जोरावर ऊसशेतीत चांगले यश मिळविता येते, हे या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे.


