
पंचनामा प्रतिनिधी – अवघ्या एक महिन्यावर आलेल्या गणेशोत्सवासाठी गावडेवाडी व धामणी (ता. आंबेगाव ) येथील परिसरात गणेशमूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्यांमध्ये गणेश मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्न असल्याचे जिल्ह्याला मूर्ती पुरवणारे गावडेवाडी येथील श्रीधर आप्पा राजगुरू व धामणी येथील दिलीप सोनवने यांनी सांगितले.
कारखान्यात तयार झालेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी पुणे, अहिल्यानगर, मुंबई, नाशिक पनवेलआदी शहरात पाठविण्यासाठी कारखानदारांची लगबग सुरू आहे. यावर्षी येत्या १४ सप्टेंबरला गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक सण असल्याने गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळतो. यावर्षीच्या उत्सवात एक ते १० फुटांपर्यंतच्या विविध आकारांच्या आकर्षक मूर्ती प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. बहुतांश मूर्ती पूर्णत्वास आल्या असून, उर्वरीतमूर्तीवर अंतिम रंगकाम आणि सजावटीचे काम सुरू आहे.
तालुक्यात यंदा सुमारे १५ ते २० गणेश मूर्तीचे कारखाने कार्यरत आहेत मंडळे तसेच, घरगुती गणेश मूर्तीसाठी येथील कारागिरांकडे आगाऊ नोंदणी करत असतात. यामुळे सर्व कारागीर दिवस-रात्र काम करून मूर्ती परिपूर्ण करण्यासाठी झटत आहेत. आकर्षक रंगसंगती, नवनवीन डिझाईन्स आणि आधुनिक डेकोरेशन यामुळे यंदाच्या मूर्तीची शैली वेगळी ठरत आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गणेश भक्त शाडूच्या मूर्तीची चौकशी करत असल्याने यावर्षी शाडूच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती देखील बनविण्यात आल्या आहेत. त्यांना देखील चांगली मागणी आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीना व शाडू मातीच्या मूर्ति बनविल्या जातात. मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कारागिरांना जास्त मजुरी देऊन कमी वेळात जास्तीत जास्त गणेशमूर्ती बनविण्याचे आव्हान प्रत्येक कारखानदारास असते. यासाठी पीओपीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे काम रात्र दिवस सुरू असते.
पेणच्या शाडूच्या मूर्ती, पुणेरी पॅरिसच्या फेटाधारी जय मल्हार, हनुमान, बाल गणेश, तांडव अवतार, घरगुती उत्सवासाठी विशेष मागणी असते.आकर्षक रंगसंगतीच्या मूर्तीला विशेष पसंती देण्यात येते. गणपती मूर्ती बनविण्याचे काम नियमित सुरू असते.
!! किमतीत वाढ आणि साहित्याचा तुटवडा !!
यावर्षी रंग, सजावटीचे साहित्य आणि मूर्ती बनविण्याचे कच्चे साहित्य आदींचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे मूर्तीच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.शाडू माती,पीओपी माती हि मंचर,खेड, पुणे येथून आणावी लागते.वीस किलो पीओपीची गोण पीओपी- ३०० रुपये, तर शाडूची वीस ते तीस किलो गोण-५००-६०० रूपयांना मिळते. तसेच वेगवेगळ्या कलरच्या किंमतीही मोठ्या प्रवाणात वाढल्या आहेत असे धामणी येथील दिलीप सोनवणे व पोपट सोनवणे यांनी सांगितले.
किमतीत वाढ झाली असली तरी भाविकांचा उत्साह पूर्वीइतकाच आहे. आपल्या आवडत्या बाप्पाच्या मूर्तीची आगाऊ नोंदणी तसेच, खरेदीसाठी लगबग सुरू आहे.परिसरातील नागरिक दोन ते तीन महिन्यांपासून ऑर्डर देत असतात. यात सार्वजनिक पीओपीच्या आकर्षक मूर्तीना मोठी मागणी आहे. कार्टून पॅटर्न डिझाईन्स, बालगणपती, डिझाईन्स तसेच, विविध प्राण्यांवर बसलेल्या मूर्ती यांचीही विक्री वाढली आह गणेश मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर, मग्न आहेत. आपल्या आवडत्या गणपती बाप्पाची मूर्ती निश्चित करण्यासाठी गर्दी करत आहेत. आपली गणेशमूर्ती ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून कारागिरांना आपल्या कलेचे कौतुक झाल्याचा आनंद मिळतो.तसेच यावर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मूर्तींच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढ करावी लागणार असल्याचे धामणी येथील दिलीप सोनवणे व पोपट सोनवणे यांनी सांगितले.




