
पंचनामा प्रतिनिधी – सामाजिक रूढी-परंपरांना आव्हान देत सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, अस्पृश्यता निर्मूलन आणि स्त्रीशिक्षणासाठी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेला संघर्ष आजच्या पिढीने समजून घेणे गरजेचे आहे, असे मत अभिनेत्री सुवर्णा भुजबळ यांनी व्यक्त केले.
निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व द. गो. वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भुजबळ यांनी एकपात्री प्रयोगातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनाचा पट विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे उभा केला.
फुले दाम्पत्याने समाजातील विषमता, अंधश्रद्धा व रूढी-परंपरांविरोधात केलेले कार्य, मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेला त्याग यांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच मोबाईलचा वापर ज्ञान व शिक्षणासाठी योग्य पद्धतीने करावा. मोबाईलच्या अतिवापरामुळे आजच्या पिढीला विविध दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या सदुपयोगाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे, पोलिस पाटील विठ्ठल वळसे पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी केले. आभार मोहन दरेकर यांनी मानले.

‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ या एकपात्री प्रयोगातून फुले दाम्पत्याचा संघर्षमय जीवनपट उलगडताना सुवर्णा भुजबळ



