
पारगाव : आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथील अनिल ज्ञानेश्वर भांड यांची नुकतीच महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाल्याबद्दल पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी पोंदेवाडी गावचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर, आनंदा पोंदे, चंद्रकांत विरकर, दूध डेअरीचे चेअरमन आनंदा भांड, सचिन साकोरे आदी उपस्थित होते.
वाळुंज म्हणाल्या, ‘‘ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रयत्न, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर शासकीय सेवेत दाखल होतात, ही कौतुकास्पद बाब आहे. स्पर्धा परीक्षेत अपयश आले तरी विद्यार्थ्यांनी खचून न जाता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवावेत. मेहनत आणि सातत्याच्या जोरावर यश निश्चित मिळते.’’
अनिल भांड यांनी सर्वसामान्य कुटुंबातून येत मेहनत व चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात मिळविलेल्या यशाबद्दल जारकरवाडी व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


