
पाण्याची मुबलक उपलब्धता आणि पोषक वातावरणामुळे बटाटा पिकाला चांगली वाढ; वाढत्या उत्पादन खर्चामुळे बाजारभावाची अपेक्षा
पंचनामा प्रतिनिधी लोणी-धामणी -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बागायती पट्ट्यात यंदा बटाटा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून, सध्या बटाटा पीक चांगलेच जोमात आले आहे. पिकाला अनुकूल वातावरण, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि थंडीची चाहूल यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, बियाण्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असून, बटाट्याला समाधानकारक बाजारभाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील निरगुडसर, मेंगडेवाडी, जवळे, भराडी, पोंदेवाडी, जारकरवाडी, लाखणगाव, देवगाव, काठापूर बुद्रुक आदी गावांच्या परिसरात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर बटाटा लागवड केली आहे. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने बटाटा उत्पादक शेतकरी चिंतेत होते. परतीच्या पावसानेही या परिसरात दडी मारली असली, तरी हा भाग नदीकाठचा बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असल्याने बटाटा पिकाची वाढ चांगली होत आहे.
बटाटा पिकासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. या परिसरात पाणी मुबलक उपलब्ध असल्याने पिकाची वाढ समाधानकारक झाली असून, यंदा उत्पादन चांगले मिळण्याची शक्यता आहे. निरगुडसर-जवळे परिसरातील बटाटा उत्पादक शेतकरी एकनाथ गावडे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
वाढत्या उत्पादन खर्चामुळे बाजारभावाची चिंता
यंदा बटाटा लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. मशागत, लागवड, खते, औषधे आणि सिंचन यांसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे बटाटा काढणीनंतर बाजारात चांगला भाव मिळणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सप्टेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात काढणीला येणारे बटाटा पीक अद्यापही शेतात असल्याने काही प्रमाणात काढणीला उशीर होणार आहे. सध्या बटाटा पिकाची वाढ जोमाने सुरू असून, जमिनीत बटाटा तयार होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात थंडीची चाहूल लागली असून, त्याचा फायदा बटाटा पिकाला होण्याची शक्यता आहे.
बटाटा हे या परिसरातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाच्या उत्पादनावर अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळण्यासोबतच बाजारात योग्य दर मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा बटाटा उत्पादक शेतकरी एकनाथ गावडे यांनी व्यक्त केली.


