
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे-बांगरवाडी येथे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, नवसंकल्पनांना आणि संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी ‘आविष्कार’ पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विज्ञान,तंत्रज्ञान आणि सामाजिक जाणीव यांवर आधारित आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केले.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. नरवडे म्हणाले, “अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना, संशोधनवृत्ती आणि सर्जनशील विचार करण्याची क्षमता विकसित होते. शिक्षणासोबत कल्पनाशक्तीला कृतिशीलतेची जोड देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष कृतीचे रूप द्यावे.”
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, डिजिटल इंडिया, स्टार्टअप संकल्पना आणि शाश्वत विकास अशा विविध विषयांवर पोस्टर्स सादर केले. पोस्टर्सची मांडणी, विषयाची निवड, संकल्पनेची नावीन्यता, दृश्य परिणामकारकता आणि विषयाशी संबंधितता या निकषांवर परीक्षकांनी परीक्षण केले.
स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल विभागातून आदित्य कांबळे व ऋषिकेश रोडे; सिव्हिल विभागातून तनिष्का क्षीरसागर व साक्षी गाडीलकर; कॉम्प्युटर विभागातून साहिल दाताळ, साक्षी गाडे व ज्योती दाताळ; इलेक्ट्रिकल विभागातून ओमकार नरवडे व शिवम बोरुडे; आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातून अथर्व थोरात; डेटा सायन्स विभागातून किरण सागर व दीप्ती गुंजाळ; तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून सिद्धेश भुजबळ व साक्षी पानसरे यांचा समावेश आहे.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. संदीप नेहे, प्रा. सुबोध घाडगे व प्रा. विजय काळे, प्रा. धनंजय भागवत, प्रा. प्रियंका लोखंडे, प्रा. प्रतीक्षा पानसरे, प्रा. पूजा घोडेकर,प्रा. अमोल दिघे तसेच डॉ.निवृत्ती चौधरी यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील व बौद्धिक उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके आणि कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत यांनी कौतुक केले.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन शैक्षणिक व संशोधन समन्वयक प्रा. सचिन शेळके यांनी केले. सूत्रसंचालन अनुष्का हडवळे व संस्कृती औटी यांनी केले. समारोपप्रसंगी प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलात्मक, वैज्ञानिक आणि बौद्धिक प्रयत्नांचे कौतुक केले.


