
पंचनामा प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथील खेळाडू आदित्य सूर्यवंशी याने उत्कृष्ट कामगिरी करत अंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड मिळवली. तसेच जुन्नर येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत समर्थ गुरुकुलची विद्यार्थिनी अवनी औटी हिने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
जुन्नर तालुकास्तरीय कराटे स्पर्धा २०२६ मध्ये समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगट व वजन गटांत उल्लेखनीय कामगिरी करत एकूण १३ प्रथम क्रमांक व १ द्वितीय क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
कराटे स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात वीरेंद्र गाजरे याने २५ ते ३० किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अवधूत भांबरे (३०–३५ किलो), सोहम नितीन शेलार (४०–४५ किलो), कार्तिक गुंडे (४५–५० किलो) आणि संस्कार डुकरे (६०–६५ किलो) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात गौरी चौधरी (३०–३५ किलो), श्रावणी चौधरी (३५–४० किलो) आणि रुद्र आहेर (४५–५० किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धेश विश्वासराव (६०–६५ किलो), विघ्नेश पवार (८२ किलो) आणि जीवन बांगर (८२ किलोपेक्षा अधिक) यांनी सुवर्ण कामगिरी केली.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात समृद्धी जाधव (६५ किलोपेक्षा अधिक), प्रचिती इंगळे (४६–४८ किलो), इशिता काकडे (४२–४४ किलो) आणि दीक्षा भोर (५५–६० किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
बॉक्सिंगमध्ये आदित्य सूर्यवंशी याने जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर जिल्हास्तरावर प्रभावी कामगिरी केली. बुद्धिबळात अवनी औटी हिने एकाग्रता, संयम, अचूक निर्णयक्षमता आणि डावपेचात्मक कौशल्याच्या जोरावर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.
समर्थ शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही विशेष प्रोत्साहन दिले जाते. क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी व अश्विनी जगदाळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. उपलब्ध क्रीडा सुविधा व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना विविध स्तरांवर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जि. प. सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे व प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले.




