
मंचर : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिराच्या महाद्वारासमोर लोकसहभागातून नवीन दगडी दीपमाळ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या बांधकामाची माहिती सोनेवाडी बुद्रुक (ता. निफाड, जि. नाशिक) येथील, धामणीचे खंडोबा देवस्थान कुळदैवत असलेल्या समस्त पडोळ पाटील मंडळींना मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत १ लाख १९ हजार ६१६ रुपयांची स्वेच्छा देणगी जमा करून देवस्थानाला प्रदान केली.

सोनेवाडी बुद्रुक येथे ग्रामस्थांची बैठक घेऊन देवस्थानाच्या दीपमाळ बांधकामासाठी गावाच्या वतीने सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ग्रामस्थांनी स्वेच्छेने एकत्रितपणे रुपये १,१९,६१६ (रुपये एक लाख एकोणीस हजार सहाशे सोळा फक्त) इतकी देणगी जमा केली.

मंगळवारी (ता. १५ सप्टेंबर) सोनेवाडी बुद्रुक येथून ४० हून अधिक ग्रामस्थ दहाहून अधिक चारचाकी वाहनांमधून धामणी येथील खंडोबा देवस्थानात दाखल झाले. कुलस्वामी खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करीत भंडारा उधळण्यात आला. त्यानंतर १ लाख १९ हजार ६१६ रुपयांची देणगी देवस्थानाचे सेवेकरी व ग्रामस्थ मंडळींच्या स्वाधीन करण्यात आली. यावेळी सेवेकरी व ग्रामस्थ मंडळींच्या वतीने समस्त सोनेवाडी बुद्रुक ग्रामस्थांना देणगीची पावती देण्यात आली.

या वेळी प्रविण अशोक पडोळ पाटील, योगेश पडोळ, भाऊराव पडोळ, उत्तम पडोळ, प्रविण भाऊराव पडोळ, नंदू पडोळ, नारायण पडोळ, सिताराम आहेर, रामदास पडोळ, सुनिल पडोळ, जनार्दन पडोळ, अनिल पडोळ, राजू पडोळ, ईश्वर पडोळ, रमेश पडोळ, संदीप पडोळ तसेच समस्त पडोळ पाटील मंडळी उपस्थित होती.

समस्त पडोळ पाटील मंडळींचा देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने पहाडदऱ्याचे सरपंच मच्छिद्र वाघ, दादाभाऊ भगत, सुभाष तांबे, दगडू करंजखेले, माऊली बोऱ्हाडे यांनी मानाची टोपी, शाल व श्रीफळ प्रदान करून सत्कार केला.

दीपमाळ ही केवळ प्रकाशाचे साधन नसून देवस्थानाच्या तसेच गावाच्या वैभवाचे आणि संपन्नतेचे प्रतीक मानली जाते. नवीन दीपमाळेच्या बांधकामासाठी रोख देणगी देणाऱ्या समस्त सोनेवाडी बुद्रुक ग्रामस्थ (ता. निफाड, जि. नाशिक) व पडोळ पाटील मंडळींचे धामणी, शिरदाळे, पहाडदरा व ज्ञानेश्वर वस्ती येथील समस्त ग्रामस्थ, सेवेकरी, मानकरी तसेच पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.






