
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावात तब्बल ८० वर्षांपासून अखंडपणे नाट्यपरंपरा जपणाऱ्या समाज विकास नाट्यमंडळाला पुणे येथील कलासारथी कला मंच यांच्या वतीने “नाट्य गौरव सन्मान-२०२६” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या गौरवामुळे रांजणी गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घोडेगाव येथील पृथ्वी लॉन्स कार्यालयात कलासारथी कला मंच यांच्या वतीने पुणे जिल्हास्तरीय भव्य कलावंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते समाज विकास नाट्यमंडळाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिबीशन चौरे, बालगंधर्व परिवाराचे सचिव अण्णासाहेब गुंजाळ, बालरंग भूमी परिषदेच्या जिल्हाध्यक्ष दिपाली शेळके तसेच वरिष्ठ अधिकारी निलेश धुमाळ उपस्थित होते.
समाज विकास नाट्यमंडळाचे कलाकार बाळकृष्ण भोर, अविनाश वाघ, संतोष वाघ आणि गणेश वाघ यांनी हा सन्मान स्वीकारला.
रांजणी गावात समाज विकास नाट्यमंडळाच्या माध्यमातून गेल्या ८० वर्षांपासून नाट्यपरंपरा जतन केली जात आहे. दरवर्षी ग्रामदैवत नरसिंह महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध समाजप्रबोधनपर नाटके सादर केली जातात. कौटुंबिक, ऐतिहासिक तसेच धार्मिक विषयांवरील नाटकांच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचे कार्य मंडळ सातत्याने करत आहे.
ग्रामीण भागात नाट्यकलेची परंपरा जपत समाजप्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे सुरू ठेवल्याबद्दल कलासारथी कला मंच, पुणे यांच्या वतीने समाज विकास नाट्यमंडळाची दखल घेण्यात आली. या सन्मानाबद्दल रांजणी ग्रामस्थांनी नाट्यमंडळातील सर्व कलाकार व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

रांजणी (ता.आंबेगाव) येथील समाज विकास नाट्यमंडळाचा सन्मान करताना मान्यवर


