सामाजिक

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्टयात डोंगराच्या काळया मैनेची आणि तोरणा फळांची रेलचेल झालीय सुरू !!

img 20260521 wa0247

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी पट्ट्यातील आहुपे–पिंपरगणे परिसर सध्या नैसर्गिक संपत्तीने बहरून गेला असून रानमेव्याची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. डोंगररांगांमध्ये वसलेल्या या भागात उन्हाळ्याच्या दिवसांत विविध रानफळांचा हंगाम सुरू झाला असून स्थानिक आदिवासी बांधवांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे.

1009545859

यंदा विशेषतः “डोंगरची काळी मैना” म्हणून ओळखली जाणारी करवंदे मोठ्या प्रमाणात पिकली आहेत. गोड, आंबट आणि तुरट अशा तिन्ही चवींचा संगम असलेली ही करवंदे चवीला जितकी खास, तितकीच आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जातात. डोंगराच्या कडेकपारीत, दाट जंगलात उगवणाऱ्या या झाडांवरील करवंदांची तोडणी करणे अत्यंत कष्टाचे आणि धोकादायक काम असते. तरीही स्थानिक आदिवासी युवक-युवती मोठ्या धाडसाने ही फळे गोळा करत आहेत.

यासोबतच या परिसरात “तोरणा” ही गोड व पिठूर फळे देखील यंदा मोठ्या प्रमाणात बहरली आहेत. अनेक वर्षांतून एकदाच झाडांना येणारी ही फळे दुर्मीळ मानली जातात. त्यांच्या चवीमुळे आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे बाजारात त्यांना चांगली मागणी असते. परिणामी, या फळांच्या विक्रीमुळे आदिवासी कुटुंबांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

1009545855

या फळांची काढणी करताना डोंगर-दऱ्यांमध्ये चढ-उतार करावे लागतात, काटेरी झुडपे आणि वन्यजीवांचा धोका पत्करावा लागतो. तरीही पारंपरिक पद्धतीने हे काम करत स्थानिक बांधव आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. बाजारपेठेत या रानफळांना चांगला दर मिळत असल्याने त्यांच्यासाठी हा हंगाम आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारा ठरत आहे.

पिंपरगणे गावचे माजी उपसरपंच भीमा गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “करवंदे आणि तोरणा ही फळे सध्या या परिसरात बहरली आहे. करवंदाची फळे दरवर्षी येतात. परंतु तोरणा ही फळे अनेक वर्षांतून एकदाच येतात. त्यामुळे आदिवासी बांधव मोठ्या मेहनतीने ती गोळा करून बाजारात विकतात. यामुळे येथील कुटुंबांना चांगले उत्पन्न मिळते.”

1009545846

एकूणच, आहुपे–पिंपरगणे परिसरातील रानमेव्याचा हा बहर केवळ निसर्गसौंदर्य वाढवणारा नसून आदिवासी समाजाच्या अर्थकारणाला हातभार लावणारा ठरत आहे. शासनाने या रानफळांच्या प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन दिल्यास स्थानिकांना अधिक स्थिर आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. असे माजी उपसरपंच भीमा गवारी यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आहुपे,पिंपरगणे भागात रानमेवा बहरला आहे. जाळीमध्ये पिकलेली ही काळीभोर करवंदे, दुसऱ्या छायाचित्रात दुर्मिळ असलेली तोरणा फळे

Related posts

अरुण खरात यांना पद्मभूषण पत्रकार बाळासाहेब भारदे पुरस्कार जाहीर !!

Chief Editor

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेच्या मागणीची एसटी प्रशासनाकडून दखल !!

Chief Editor

मिडगुलवाडी गावाला जिल्हा परिषदेकडून घंटागाडी !!

Chief Editor

Leave a Comment