
पंचनामा प्रतिनिधी – उंचखडक, राजुरी येथील उत्तम बबन मुळे परिवारातील बहिण – भावंडांनी आपली आई सौ. विमल उत्तम मुळे यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा येथील हनुमान मंदिर सभागृहात नुकताच आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
अहिल्यानगर येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. केशवमहाराज जगदाळे यांच्या सुश्राव्य प्रवचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी मातोश्रींचे औक्षण झाल्यानंतर कुटुंबातील सर्वच मुलांना आयुष्यभर पुरणारी संस्कारांची शिदोरी देणाऱ्या वंदनीय विमलताई आणि उत्तम मुळे या उभयतांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित ‘आधारवड’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सर्व चुलत- मावस – आते – मामे भावंडांनी आणि या परिवाराशी संबंधित अनेक हितचिंतकांनी आईदादांच्या जागवलेल्या आठवणींना शब्दबद्ध रूपाने संकलित करून या लेखसंग्रहाचे बाळू मुळे, डॉ. सौ. लता पाडेकर आणि प्रा.संगिता सरोदे या भावंडांनी ‘आधारवड’ या गौरवग्रंथाचे संपादन केले. हा समारंभ उंचखडक येथील प्रगतशील शेतकरी तात्याभाऊ यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

मुळे परिवारातील लहान थोरांनी लिहिलेल्या आठवणींचे बासष्ट लेख ग्रंथरूपाने प्रकाशित करून मुळे भावंडांनी ग्रामीण भागातील मुलांसमोर अनोखा आदर्श ठेवला आहे. याप्रसंगी उपस्थित नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ स्मिता कणसे, पंकज कणसे, विश्वकर्मा पब्लिकेशनचे संदिप तापकीर, ह.भ.प. गंगारामबुवा डुंबरे, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद, जुन्नर, बाल मैत्रिण शारदा डुंबरे, स्तंभलेखक संजय नलावडे, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापक बाळकृष्ण बाचल, बाळासाहेब कानडे, उपक्रमशील शिक्षक मनोहर इनामदार आदी सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतात आईदादांबद्दल कृतज्ञतापूर्वक भाव व्यक्त करून गौरवौद्गार काढले आणि सर्व भावंडांना धन्यवाद दिले.

सदर समारंभाला अनंतराव गटकळ, अंजनी डुंबरे, सुरेश कणसे, ज्ञानेश्वर गटकळ, मंदाकिनी घंगाळे, सतीश बांगर, कृष्णा कोल्हे, सारंग म्हात्रे, कल्पना चव्हाण, प्रशांत वाघमारे, सतीश मोरे, मनिषा सरोदे आदी अनेक नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समारंभासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला आधारवड या गौरवग्रंथाची एक प्रत विनामूल्य भेट देण्यात आली. तसेच मुळे कुटुंबियांच्या वतीने सर्वांसाठी सुरूची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या अतिशय देखण्या समारंभाची प्रस्तावना डॉ. सौ. लता पाडेकर यांनी केली तर सूत्रसंचालन प्रा. संगिता सरोदे यांनी केले. रमेश मुळे, तंटामुक्ती अध्यक्ष, मांजरवाडी यांनी सर्वांचे आभार मानले.

