सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी? तुटलेल्या वीजवाहक तारेचा करंट लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

img 20260514 wa0687
1009481275

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावामध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून धनगर समाजातील महिलेचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संगीता बाबाजी तिखुळे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता तिखुळे या वाड्याशेजारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी परिसरात पडलेली व विद्युत प्रवाह सुरू असलेली तुटलेली वीज तार त्यांच्या पायात अडकली. अचानक जोरदार वीजेचा धक्का लागल्याने त्या जागीच कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक अमर बारवकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, संबंधित वीज तार तब्बल पाच दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत पडून होती. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली नाही किंवा याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वेळेत दुरुस्ती झाली असती तर एका निष्पाप महिलेचा जीव वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या दुर्दैवी घटनेमुळे तिखुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृत महिलेच्या पश्चात पाच लहान मुले आहेत. आईच्या अचानक जाण्यामुळे कुटुंब उघड्यावर आले असून संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावातही अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. त्यामुळे तालुक्यातील ही दुसरी घटना ठरली असून महावितरणच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धनगर समाजातूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून मृत महिलेच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच तालुक्यातील धोकादायक वीज तारा तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Related posts

वाणिज्य विभागाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य वर्गाचा इंटरशिप प्रोग्राम समारोप संपन्न !!

Chief Editor

पारगावमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी!

Chief Editor

वारली कलेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन; समर्थ गुरुकुलमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात

Chief Editor

Leave a Comment