सामाजिक

मांदळेवाडी येथे वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी चिंतेत !!

1011340070
1011340070

रानडुक्कर, तरस, कोल्हे आणि हरणांकडून पिकांची नासधूस; वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

पंचनामा प्रतिनिधी मांदळेवाडी – आंबेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त मांदळेवाडी परिसरातील ढगे वस्ती येथे वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. डोंगराळ भौगोलिक रचना, डोंगर परिसरातील झाडी आणि सुरक्षित अधिवासामुळे रानडुक्कर, तरस, कोल्हे व हरणांचा वावर वाढला असून हे वन्यप्राणी थेट शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत. त्यामुळे मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

या परिसरात गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ओढे-नाले आणि विहिरींमधील उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली आहे. सध्या ज्वारी, कांदा, गोल्डन मका आणि बटाटा ही पिके चांगली वाढली असतानाच वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. मोठ्या कष्टाने आणि खर्च करून उभी केलेली पिके डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे आर्थिक फटका

ज्वारी, कांदा, गोल्डन मका आणि बटाटा ही या परिसरातील शेतकऱ्यांची महत्त्वाची पिके आहेत. या पिकांवरच शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. मात्र, वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच शेतीचा वाढता खर्च, पाणीटंचाई आणि अनिश्चित हवामान यामुळे शेतकरी अडचणीत असताना वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. सध्या या परिसरात विशेषतः रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात

वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत. मात्र, वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि रात्रीच्या वेळी होणारी पिकांची नासधूस यामुळे या उपाययोजना अपुऱ्या ठरत आहेत. त्यामुळे वनविभागाने मांदळेवाडी परिसरातील ढगे वस्ती येथे प्रत्यक्ष पाहणी करून वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होऊ नये आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, मोठ्या मेहनतीने उभी केलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी उपसरपंच रवींद्र ढगे पाटील, मारुती ढगे पाटील, अमोल ढगे पाटील, सन्नी ढगे पाटील, बबन ढगे पाटील यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

1011291568

Related posts

माॅडेल स्कुल शिंगवे शाळेचे सामाजिक अंकेक्षण पूर्ण !!

Chief Editor

जवळे येथे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप !!

Chief Editor

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा !!

Chief Editor

Leave a Comment