
नवरात्रोत्सवात शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम; ‘कौरव-पांडवांचा खेळ’ पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी
पंचनामा प्रतिनिधी – खडकवाडी -आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुरातन भैरवनाथ मंदिरात पारंपरिक सोंगट्यांचा खेळ रंगत आहे. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपली असून, आधुनिक काळातही या खेळाचे आकर्षण कायम आहे. ‘कौरव-पांडवांचा खेळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पारंपरिक खेळाची मैफल रात्री उशिरापर्यंत रंगत आहे.
नवरात्रोत्सव म्हटले की अनेक ठिकाणी दांडिया, गरबा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, खडकवाडी येथे नवरात्रोत्सवात सोंगट्यांचा पारंपरिक खेळ खेळण्याची अनोखी परंपरा आहे. गावातील पुरातन भैरवनाथ मंदिरात वर्षातून केवळ नवरात्रोत्सवाच्या काळात हा खेळ आयोजित केला जातो. या खेळासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने एकत्र येतात.
या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे रात्री सुरू झालेली मैफल पहाटेपर्यंत रंगते. खेळात सहभागी झालेले नागरिक इतके तल्लीन होतात की, त्यांना वेळेचेही भान राहत नाही. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा खडकवाडीतील ज्येष्ठ नागरिकांनी आजही जतन केली आहे.
या पारंपरिक खेळात लोणी, धामणी, रानमळा, वाळुंजनगर, पोंदेवाडी आणि खडकवाडी येथील सोंगट्यांच्या खेळाची आवड असलेले नागरिक आवर्जून सहभागी होतात. त्यामुळे हा खेळ केवळ मनोरंजनाचे साधन न राहता परिसरातील नागरिकांना एकत्र आणणारा आणि सामाजिक सलोखा वाढविणारा उपक्रम ठरत आहे.
या खेळात नाथा सुक्रे, सुरेश नाना सुक्रे, बबन भोजने, एकनाथ सुक्रे, देवराम वाळुंज, अशोक आदक पाटील, डॉ. नाथा सुक्रे, मथु सुक्रे, भीमराव वाळुंज, नथू सुक्रे, कांताराम भोजने, बाळासाहेब धुमाळ, दत्तात्रेय सुक्रे, कैलास सुक्रे, नामदेव सुक्रे, लहू डोके, संपत सुक्रे, ज्ञानेश्वर सुक्रे, पृथ्वीराज शिंदे, किरण सुक्रे आणि गोरक पोखरकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी होतात. दररोज ज्ञानेश्वर प्रसादिक भजनी मंडळाच्या वतीने सुश्राव्य भजन सादर केले जाते. विशेष म्हणजे, या उपक्रमाला परिसरातील महिला भगिनींचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते.
ग्रामीण संस्कृतीचा अनमोल वारसा
आजच्या आधुनिक युगात पारंपरिक खेळांचे महत्त्व कमी होत असताना खडकवाडीकरांनी मात्र आपला सांस्कृतिक वारसा जपला आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित होणारा सोंगट्यांचा हा खेळ ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागातून आजही उत्साहात सुरू आहे. नव्या पिढीनेही अशा पारंपरिक खेळांची माहिती घेऊन त्यांचे जतन करावे, अशी भावना माजी सरपंच अनिल डोके यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा वाढत असून, एकमेकांबद्दल आदराची भावना दृढ होत आहे.

खडकवाडी येथे नवरात्रोत्सवानिमित्त पारंपरिक सोंगट्यांचा खेळ खेळताना ग्रामस्थ.




