
मंचर : आंबेगाव तालुक्यात गणेशोत्सवाची धूम सुरू असून, विविध गणेश मंडळांकडून आकर्षक देखावे साकारण्यात येत आहेत. पूर्व भागातील आदर्श गाव गावडेवाडी येथील भैरवनाथ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून, ‘पंढरीची वारी रघुनंदनांच्या घरी’ हा आगळावेगळा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
भैरवनाथ गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष शिवाजी म्हातारबा गावडे यांचे अकाली निधन झाल्याने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मंडळाच्या वतीने दहा फूट उंचीच्या आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, सकाळी व सायंकाळी महाआरतीचे आयोजन केले जात आहे.

गावडेवाडीतील मुंबई येथे फळांचा व्यापार करणारे अरुण रघुनाथ गावडे, श्यामराव गावडे, सोसायटीचे माजी चेअरमन रवींद्र रघुनाथ गावडे आणि प्रदीप गावडे यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत हा देखावा साकारला आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून कुटुंबातील सदस्यांचे फोटो वारकरी वेशभूषेत साकारण्यात आले आहेत. गणरायासमोर पंढरीच्या वारीत पायी सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा देखावा उभारण्यात आल्याने प्रत्यक्ष पंढरीची वारी डोळ्यासमोर उभी राहिल्याचा अनुभव भाविकांना येत आहे.
गणेशमूर्ती, वारकरी वेशातील कुटुंबीय आणि पंढरीच्या वारीचे वातावरण यामुळे हा देखावा विशेष आकर्षण ठरत आहे. पंचक्रोशीतून आबालवृद्ध हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत असून, रघुनंदन परिवाराने साकारलेल्या या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत आहे.



