
पंचनामा विशेष – आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांची मने जिंकणारे खलनायक संभाजीराव कोल्हे मु.पो.हावरगाव,ता.कळंब, जि.धारा शिव !!
त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. त्यांच्या आईचे नाव पमाबाई असे आहे. संभाजीराव हे सोळा वर्षाचे असतानाच कला थोडी अवगत झाली होती. ती म्हणजे ऐतिहासिक, पौराणिक सामाजिक कौटुंबिक नाटकात लहान मोठी भूमिका करीत होते.त्यांचा हा छंद चांगलाच रंगत गेला. सोळाव्या वर्षातच त्यांना कलेची विद्या प्राप्त झाली होती. तमाशात जाऊन आपणही मोठे नाव केले पाहिजे ही त्यांच्या मनात जिद्द पेरली.

तमाशा क्षेत्रात चांगलीच सरस्वती प्रसन्न होऊन आता कोल्हे हे चांगल्या भूमिका रंगवू लागले आणि मेन आवडती भूमिका म्हणजे खलनायकाची !! ही भूमिका त्यांनी हस्तगत करून कै.संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर,सुरेखा पुणेकर,विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर आणि कलाभूषण रघुवीर खेडकर या तमाशा फडात अतिशय उत्तम प्रकारच्या भूमिका करून आपले नाव महाराष्ट्रात गाजविले.
त्यांनी सत्वशील राजा हरिश्चंद्र ,झाला उद्धार चौरंगीचा ,धन्य ती सावित्री राणी, विक्रम राजा शनिदेव, कृष्णाने फोडली बंदी शाळा ,द्रोपदी वस्त्रहरण ,स्वप्न भंगले संसाराचे,नागपूरचा अक्कू यादव,खैरलांजी हत्याकांड,सासरचा विषारी विळखा इत्यादी वगनाट्यात काम करून रसिकांच्या शाब्बासकीची थाप मिळवली. हेच मोठे भाग्य मी समजतो असे संभाजी कोल्हे यांनी स्पष्ट केले.

संभाजी कोल्हे यांची शब्द फेक हावभाव,उंच पहाडी आवाज रागीट शांत आणि प्रेमळ या तिन्ही गोष्टी आपल्या आचरणात साध्य केल्या आहेत.त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वगनाट्यातील भूमिका रसिकांना आवडत्या झाल्या. रसिक त्यांच्या खलनायकी कामाला पाहून अपमानास्पद, वागणूक देत होते.परंतु संभाजीराव हे सांगतात की तीच माझ्या कलेची पावती होय.
खरंच संभाजीराव स्टेजवर कधी येतात याची रसिक वाट बघतात.त्यांची भूमिका करण्याची पद्धत ही काही वेगळीच आहे.त्यांची राहणीमान एकदम सिम्पल असून प्रेमळ भाषा ,फड मालकाची आवड ,रसिकांची आवड कलेवरील प्रेम हे सर्व गुण त्यांच्या अंगी आहेत.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य तमाशा रंगभूमीवर गाजवीत असून गेली 57 वर्ष रसिकांची सेवा करीत आहेत. ते सांगतात की ,जुना तमाशा आणि आताचा तमाशा यामध्ये जमीन आसमान चा फरक आहे. कारण पहिला तमाशाचा बाज काही वेगळाच होता.आता फक्त रसिक गाणी मागतात.त्यामुळे वगनाट्य बघणाऱ्यांनी तमाशाकडे थोडी पाठ फिरवली आहे.

तमाशाचे पहिले वाद्य म्हणजे पायपेटी, नाल तुंतूने, हालगी होते आणि आता सगळं वाद्य रिमिक्स झालेले आहे, त्यामुळे स्टेजवर काय सावळा ,गोंधळ आहे याचे बोल नीट ऐकू येत नाही आणि लावणी सुद्धा रिमिक्स पद्धतीने वाजवतात. किती अवघड परिस्थिती आहे.लावणी ही नाल तुंतूने ,पायपेटी या संगीतावर जर वाजवली तर तिचा आस्वाद रसिकांना काही वेगळाच मिळतो हे अगदी खरं आहे.कारण लावणी म्हणजे हा तमाशाचा आत्मा आहे.
असे ते म्हणाले.तसेच तमाशातून समाज प्रबोधन होते ,रसिकांना या मराठमोळी रांगड्या कलेचा आनंद लुटता येतो.काही कलाकार नृत्यांगना यांचे पोट या तमाशावर भरतात आणि ते आपल्या संसाराची गाडी चालवतात.

आज त्यांचे वय 67 वर्षाचे असून, आजही रसिकांची सेवा करतात.सर्वात जास्त कला भूषण रघुवीर खेडकर या तमाशा मंडळास त्यांचे भरपूर योगदान आहे आणि शेवटी म्हणाले की ,पहिला तमाशा गाडी बैलाचा मातीच्या स्टेजचा रॉकेलच्या टेंभ्याचा आणि गॅसबतीचा होता आणि या आधुनिक जगात तमाशा
लाइटिंगचा, इलेक्ट्रिक वाद्याचा ,आणि रिमिक्स गुणांचा असा दिसून येतो .जुन्या पद्धतीचा तमाशा म्हणजे काही वेगळाच होता. पण शेवटी वार बघूनच, उफनावे लागते.जग हे इलेक्ट्रॉनिक झालेले आहे. त्यांच्या परीने नाइलाजाने हा तमाशा दाखवावा लागतो असे ते शेवटी म्हणाले.शासनाने माझा, माझ्या कलेचा, माझ्या वयाचा विचार करून, मला पुरस्कार मिळावाअशी नम्रतेची विनंती करतो. ही माझी शेवटची इच्छा आहे असे बोलताना डोळ्यांमध्ये गंगा ,यमुना उभ्या राहिल्या.

खरंच त्यांनी केलेल्या रसिकांच्या सेवेला ,त्यांच्या खलनायकी भूमिकेला धन्यवाद !!
त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे आनंदाचे जावो त्यांच्या हातून रसिकांची सेवा घडो त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या पुरस्काराची इच्छा प्राप्त होवो हीच
माते जगदंबेच्या चरणी प्रार्थना !!
लेखक – शाहीर खंदारे (ता
नेवासा)
८६०५५५८४३२..
