
बटाटा पिकावर फिरवला रोटर.
पंचनामा प्रतिनिधी- पहाडदरा (ता.आंबेगाव ) येथील शेतकर्यांनी सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेल,या आशेवर बटाटा लागवड केली; मात्र लागवडीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.पावसाअभावी बटाटा पीक अक्षरशः होरपळून निघाले असून,पिकाची अवस्था पाहून हतबल झालेल्या कैलास वाघ व मच्छिंद्र वाघ या शेतकऱ्यांनी अखेर आपल्या सात एकर बटाटा पिकावर रोटर फिरवण्याचा कठोर निर्णय घेतला. मोठ्या अपेक्षेने केलेल्या लागवडीवरच रोटर फिरवण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सप्टेंबर महिन्यात पावसाच्या आशेवर सात एकर क्षेत्रात बटाटा लागवड करण्यात आली होती.पीक चांगले येईल आणि त्यातून आर्थिक उत्पन्न मिळेल,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.मात्र,लागवडीनंतर पावसाने पाठ फिरवल्याने बटाटा पिकाला आवश्यक ओलावा मिळाला नाही.परिणामी,पिकाची वाढ खुंटली.लागवड करून जवळपास पावणेदोन महिने उलटले,तरी बटाट्याच्या झाडांना कंदच लागले नसल्याचे चित्र समोर आले.त्यामुळे पीक जगविण्याची आशा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांनी अखेर पीक काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
लागवडीसाठी लाखो रुपयांचा खर्च.!!
सात एकर बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. कोंबडी खतासाठी जवळपास एक लाख १५ हजार रुपये, रासायनिक खतांसाठी सुमारे ६३ हजार रुपये खर्च करण्यात आले. तसेच बटाटा बियाणे खरेदीसाठीही मोठी रक्कम खर्च झाला.याशिवाय खुरपणी, फवारणी, मजुरी आणि इतर शेतीकामांवर अतिरिक्त खर्च करावा लागला.बटाटा लागवडीसाठी एकरी सुमारे ११ ते १३ कट्टे बियाणे वापरण्यात आले. सात एकर क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात बियाणे लागले असून, त्यासाठी सव्वा लाख रुपयांच्या आसपास खर्च झाल्याचे सांगण्यात येते. सरासरी बटाटा लागवडी पासून ते आता पर्यंत पाच ते सव्वा पाच लाख रुपये खर्च झाल्याचे कैलास वाघ यांनी सांगितल.पिकासाठी केलेला हा सर्व खर्च पावसाअभावी वाया जाण्याची वेळ आली असल्याने शेतकरी हतभल झाले आहेत.
डोळ्यांसमोर उभे राहिले आर्थिक संकट.!
शेतीसाठी कर्ज, बचत आणि उसनवारी करून पैसे उभे करायचे, पीक जोमात वाढावे म्हणून मेहनत घ्यायची आणि अखेर पदरात काहीच पडणार नसेल तर शेतकऱ्याने जगायचे कसे, असा प्रश्न या परिस्थितीतून निर्माण झाला आहे. बटाटा पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने केलेली गुंतवणूक वाया गेल्याने कैलास वाघ व मच्छिंद्र वाघ यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
पावसाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला असून, शेतीतील वाढता खर्च आणि अनिश्चित पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. सात एकर बटाटा पिकावर रोटर फिरवण्याची वेळ येणे ही केवळ दोन शेतकऱ्यांची व्यथा नसून, पावसाअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे विदारक चित्र आहे. विजेष म्हणजे मच्छिंद्र वाघ हे गावचे सरपंच तर कैलास वाघ हे उपसरपंच म्हणून काम करतात. पण त्यांना शेतीची प्रचंड आवड असल्याने गाव गाड्या व्यतिरिक्त सर्व लक्ष शेतीकडे असते.

बटाटा पिकाला बटाटा नाही हे दाखविताना शेतकरी

बटाटा पिकावर रोटर फिरविताना शेतकरी



