
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालय व रिसर्च सेंटर, बेल्हे समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आणि समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंग बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ संकल्प अभियान उत्साहात संपन्न झाले. तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवून निरोगी, सक्षम आणि सुदृढ समाजनिर्मिती करण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले.
आजच्या काळात देशातील तरुण पिढी विविध प्रकारच्या व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. व्यसनांमुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनही प्रभावित होते. त्यामुळे युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करून त्यांना सकारात्मक जीवनमूल्यांची प्रेरणा देणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा आळेफाटा येथील स्नेहा मॅडम आणि महेश सर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी व्यसन, ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांबाबत मार्गदर्शन केले. निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार, आत्मसंयम आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या माध्यमातून व्यसनांपासून दूर राहता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी विद्यार्थ्यांना ‘नशामुक्तीची प्रतिज्ञा’ देण्यात आली. व्यसनांपासून स्वतः दूर राहण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवारात, कुटुंबात आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
अभियानाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. हातात व्यसनमुक्तीचे संदेश असलेले फलक घेऊन तसेच विविध घोषवाक्ये देत विद्यार्थ्यांनी परिसरातून रॅली काढली. ‘व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार’, ‘नशामुक्त युवा—विकसित भारत’, ‘व्यसनमुक्त समाज, सक्षम समाज’ अशा प्रभावी घोषणांनी संपूर्ण समर्थ परिसर दुमदुमून गेला. रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनाचे प्रभावी कार्य केले.
व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी केवळ वैयक्तिक प्रयत्न पुरेसे नसून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजाचा सामूहिक सहभाग आवश्यक आहे. युवकांनी आपल्या ऊर्जेचा आणि क्षमतेचा उपयोग शिक्षण, कौशल्यविकास, क्रीडा, संशोधन व राष्ट्रनिर्मितीसाठी करावा, असा संदेश या अभियानातून देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.
या उपक्रमासाठी समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय लोंढे, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब भुतकर, ऐश्वर्या गटकळ, आकाश क्षीरसागर, यशवंत फापाळे, तसेच डॉ. श्रवंती तोडचिरकर, डॉ. जयश्री मते, डॉ. कृतिका कांबळे, डॉ. स्नेहल गायकवाड आणि यांनी विशेष प्रयत्न केले.
डॉ.मधुसूदन कुऱ्हाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. मानसी गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.



