
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी,पारगाव,शिंगवे,लोणी धामणी,वडगावपीर,मांदळवाडी पहाडदरा,शिरदाळे,लाखनगाव,पोंदेवाडी गावांमध्ये श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
गावोगावी नागदेवतेची पूजा, नैवेद्य, पारंपरिक गाणी तसेच महिला व मुलींच्या पारंपरिक खेळांनी सणाला विशेष रंगत आली.
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण असून नागदेवतेप्रती श्रद्धा व्यक्त करण्याबरोबरच निसर्ग आणि सजीवसृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा या सणामागे आहे. ग्रामीण भागात सापांना शेतीचे मित्र व पिकांचे रक्षक मानले जाते. त्यामुळे नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धी, आरोग्य व संरक्षणासाठी प्रार्थना केली जाते. नागपंचमीचा सण धार्मिक परंपरेसोबतच पर्यावरणीय समतोल आणि निसर्गाशी सुसंवादाचा संदेश देतो.
पूर्व भागातील गावांमध्ये महिलांनी व मुलींनी पारंपरिक पद्धतीने नागदेवतेची पूजा करून फुले, हळद-कुंकू, लाह्या आदींचा नैवेद्य अर्पण केला. अनेक ठिकाणी घराघरांत नागाची प्रतिमा किंवा मातीची प्रतिकृती तयार करून पूजा करण्यात आली. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणणे किंवा नांगरणे टाळण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी जपली जाते.
झिम्मा-फुगडी, झोका अन् पारंपरिक खेळांची रंगत नागपंचमी म्हटले की महिलांच्या पारंपरिक खेळांना विशेष महत्त्व असते. गावातील महिला व मुली एकत्र येऊन झिम्मा, फुगडी, पिंगा, फेर धरणे, झोका यांसारखे पारंपरिक खेळ खेळत सणाचा आनंद लुटतात. काही ठिकाणी पारंपरिक गाणी म्हणत उखाणे घेण्याचीही प्रथा आहे. त्यामुळे नागपंचमी हा केवळ धार्मिक सण न राहता महिला आणि मुलींना एकत्र आणणारा सामाजिक व सांस्कृतिक उत्सव ठरतो.
विशेषतः झाडांच्या फांद्यांना बांधलेल्या झोक्यांवर झोके घेताना महिलांच्या पारंपरिक नागपंचमीच्या गीतांनी गावातील वातावरण उत्साहाने भारून गेले. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे हे खेळ आणि लोकपरंपरा पोहोचत असल्याने ग्रामीण संस्कृतीचे जतन होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
श्रद्धा, निसर्गाशी असलेले नाते आणि पारंपरिक लोकसंस्कृतीचा संगम असलेल्या नागपंचमीच्या सणामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आधुनिक काळातही पारंपरिक सण-उत्सव आणि खेळांची परंपरा जपण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.




