
पंचनामा प्रतिनिधी – शेतीमालाच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. धनिया, मेथी, टोमॅटो, शेपू यांसह विविध भाजीपाला पिकांचे बाजारभाव सध्या मोठ्या प्रमाणात कोसळले असून, अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत शेतकरी महेंद्र वाळुंज यांनी सांगितले की, भाजीपाला पिकवण्यासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, बाजारात शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उत्पादन खर्च, वाहतूक व मजुरीचा खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात अत्यल्प रक्कम शिल्लक राहत आहे.
दरम्यान, वाढत्या महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खते, औषधे तसेच बी-बियाण्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. खतांच्या किमती तर गगनाला भिडल्या असून, उत्पादन खर्च वाढत असताना शेतीमालाचे दर मात्र घसरत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
युवा प्रगतिशील शेतकरी जयेश वाळुंज यांनी सांगितले की, शेतीचा वाढता खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला किफायतशीर दर मिळण्यासाठी बाजार व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


