
अंतराळ संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची मिळणार संधी; ग्रामीण विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक !!
पंचनामा प्रतिनिधी : मोरडेवाडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन विद्यार्थ्यांची युरोपियन स्पेस एजन्सी (ESA), नासा आणि इस्रोच्या अंतराळ संशोधन केंद्रांना भेट देण्यासाठी होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. मनस्वी कांताराम मोरडे व अनुवेद अभिजीत ढोबळे या विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मोरडेवाडी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या दृष्टीने हा अभ्यास दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना इंग्लंड येथील युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) तसेच नासा आणि इस्रोच्या अंतराळ संशोधन केंद्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अंतराळ संशोधनातील विविध उपक्रम, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रातील प्रगती यांची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना शाळेचे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले, वर्गशिक्षिका कविता वळसे, बाळकृष्ण बेल्हेकर तसेच अनुवेदचे वडील अभिजीत ढोबळे व आई विजया ढोबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, रायगड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी दहीतुळे, आंबेगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका, मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष राजश्री गांजाळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात, शिक्षण विस्तार अधिकारी शैला निनमे, केंद्रप्रमुख पंकजा हगवणे, बबन मोरडे, दत्तात्रय मोरडे, धनराज मोरडे, बाजीराव मोरडे, विशाल मोरडे, कांताराम मोरडे, विकास मोरडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश बढे, विजय घिसे आणि सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मोरडेवाडीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंतराळ संशोधन केंद्रांना भेट देण्याची संधी मिळवून दिलेले हे यश शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना विज्ञान व अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात पुढे जाण्यास निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.



