सामाजिक

खड्ड्यांतूनच दत्तदर्शन! सौरंगा दत्तमंदिराच्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; भाविकांचा संताप !!

1010673264
1010673265

“एक खड्डा चुकवताना दहा खड्ड्यांचा सामना!” — रस्ता दुरुस्त कधी होणार?

पंचनामा प्रतिनिधी समीर गोरडे – श्रद्धेचे प्रमुख केंद्र असलेल्या सौरंगा दत्तमंदिराकडे जाणारा रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी व्यापला असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांसह हजारो भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.

महिला, वृद्ध, लहान मुले तसेच दूरदूरहून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या खराब रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांना एक खड्डा चुकवताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन आदळत असल्याने वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताचा धोकाही वाढला आहे.

1010673263

एकेरी रस्ता, बाजूला चुकीच्या पद्धतीने गटारे; अपघाताची भीती

सौरंगा दत्तमंदिराकडे जाणारा हा रस्ता अनेक ठिकाणी अत्यंत अरुंद व एकेरी स्वरूपाचा आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारांची स्थितीही योग्य नसल्याने वाहन घसरून अथवा बाजूला जाऊन अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या मार्गावरून दररोज ग्रामस्थांसह शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने ये-जा करतात. विशेषतः धार्मिक कार्यक्रम, यात्रा व विशेष दिवसांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने खराब रस्त्याची समस्या आणखी गंभीर बनते.

पूर्वी बुजवलेले खड्डे पावसात पुन्हा उघडे

यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

1010673261

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, तात्पुरती डागडुजी करून हा प्रश्न सुटणार नाही. या मार्गाची कायमस्वरूपी आणि दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.

खेडमध्ये मंदिर, आंबेगावकडील रस्ता; जबाबदारी कोणाची?

या प्रश्नात आणखी एक गंभीर बाब म्हणजे सौरंगा दत्तमंदिराचा परिसर खेड व आंबेगाव तालुक्यांच्या सीमावर्ती भागात येत असल्याने रस्त्याच्या विकासाबाबत जबाबदारी निश्चित करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिर एका तालुक्याच्या हद्दीत आणि रस्ता व परिसर दुसऱ्या तालुक्याशी संबंधित असल्याने या महत्त्वाच्या मार्गाकडे लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन पुरेसे लक्ष देत नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

“श्रद्धेचा मार्ग की प्रशासनाच्या दुर्लक्षाचा पुरावा?”

सौरंगा दत्तमंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे महत्त्वाचे ठिकाण असून येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठीच भाविकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असेल, तर संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

“देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत आहे. एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

ग्रामस्थांची ठाम मागणी

ग्रामस्थ व भाविकांनी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच दोन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी तातडीने संयुक्त पाहणी करून या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम त्वरित मंजूर करावे, अशी मागणी केली आहे.

आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का? की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार?

सौरंगा दत्तमंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावून ग्रामस्थ व भाविकांना खड्ड्यांच्या त्रासातून मुक्त करावे, अशी सर्वांची एकमुखी मागणी आहे.

प्रशासनाला थेट सवाल :

“दत्तदर्शनासाठी खड्ड्यांतून प्रवास किती दिवस? सौरंगा मंदिराचा रस्ता तातडीने दुरुस्त करा!”

1010672208
1010560300
1010480394

Related posts

पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाला शिवजयंती सोहळा!!

Chief Editor

बादोल्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा ५८ हजार रुपयांचा नोटाचा हार घालून अनोखा वाढदिवस साजरा !!

Chief Editor

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

Chief Editor

Leave a Comment