
पंचनामा प्रतिनिधी – वाळुंजनगर (ता.आंबेगाव) येथे श्री कमळजादेवी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त देवीच्या काठीची व पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक धार्मिक विधी, भजन, कीर्तन आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

उत्सवानिमित्त सोमवारी (दि. १६) पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत मंदिरात काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी देवीच्या नवरसाचे चोळी-पातळ, हारतुरे व मांडव डहाळे यांची मिरवणूक काढून ते देवीस अर्पण केले. दुपारी देवीची काठी आणि पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला.

सायंकाळी चार वाजता भागवताचार्य गणेश महाराज शिंदे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नऊ ते अकरा या वेळेत संजय महाराज वाळुंज स्वस्तरंग भजनी मंडळ (वाळुंजनगर) यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. या धार्मिक कार्यक्रमांना ग्रामस्थ व भाविकांनी मोठी उपस्थिती लावली.

यावेळी भीमाशंकर कारखान्याचे मा.अध्यक्ष देवदत्त निकम, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, सरपंच तृप्ती महेंद्र वाळुंज, उपसरपंच बाळासाहेब वाळुंज, उद्योजक नामदेव वाळुंज, माजी प्राचार्य लक्ष्मण वाळुंज, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष पडवळ, बाळासाहेब भोर, माजी सरपंच जालिंधर वाळुंज यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
उत्सवाचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण राघू वाळुंज, उपाध्यक्ष संतोष दुर्गा वाळुंज, माजी सरपंच महेंद्र वाळुंज, राजकिरण वाळुंज आदींनी केले.

