
पंचनामा प्रतिनिधी – निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे पारंपरिक वेशभूषेतील आकर्षक नंदीबैलाने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. अंगावर रंगीबेरंगी कपडे, विविध प्रकारच्या माळा, आकर्षक अलंकार, डोक्यावर मोरपिसांचा तुरा आणि पाठीवर सुंदर झूल परिधान केलेला पांढराशुभ्र नंदीबैल पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवार (दि. १७) रोजी हा नंदीबैल निरगुडसर येथे दाखल झाला होता.

सनई, डमरू आणि ढोलकीच्या तालावर नंदीबैलाला नाचविण्यात आले. नंदीबैलाने मान हलविल्याने घरात सुख-समृद्धी येते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा असल्याने नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने नंदीचे दर्शन घेतले. यावेळी गावातील बालगोपालांसह आबालवृद्धांनी नंदीबैलाची आकर्षक सजावट पाहण्याचा आनंद घेतला. नंदीबैलवाल्यांना ग्रामस्थांकडून धान्य, पैसे आणि कपड्यांच्या स्वरूपात मदत दिली जाते. याच माध्यमातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

नंदीबैल ही महाराष्ट्राची जुनी आणि पारंपरिक लोककला आहे. मात्र, आधुनिकतेच्या काळात ही लोककला हळूहळू लोप पावत चालली आहे. तरीही काही कलाकार आजही ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
३५ वर्षांपासून परंपरेचे जतन
चांडोली (ता. आंबेगाव) येथे राहणारे शिवराम अण्णा आवाड (वय ७५) हे गेल्या ३५ वर्षांपासून नंदीबैलाची पारंपरिक कला सादर करीत आहेत. त्यांचे मूळ गाव शनिशिंगणापूर असून, ते गेली ३५ वर्षे चांडोली येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा नातू दादाभाऊ सर्जा आवाड (इयत्ता दहावी), जावई संजय रघुनाथ जाधव आणि नातू महेंद्र रघुनाथ जाधव (इयत्ता तिसरी) हेही या कलेच्या सादरीकरणात साथ देतात.

या पारंपरिक कलेविषयी बोलताना शिवराम आवाड म्हणाले, “गेली अनेक वर्षे आम्ही ही कला जपत आहोत. मात्र, माझ्यानंतरची पुढची पिढी ही कला जोपासेल की नाही, याची खात्री नाही. या पारंपरिक कलेला शासनाने आर्थिक मदत आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.”
ग्रामीण भागातील संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या अशा लोककलावंतांना शासनाचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे. अन्यथा, पुढील काळात नंदीबैलासारखी पारंपरिक लोककला केवळ आठवणींत उरेल, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे पारंपरिक वेशभूषेतील नंदीबैलाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष.
