
पंचनामा प्रतिनिधी लोणी-धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम जोरात सुरू झाला असून, परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकरी कांदा लागवडीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने उन्हाळी कांदा पिकासाठी भविष्यात पाणी कसे उपलब्ध करायचे, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच खतांच्या वाढलेल्या किमती, महागलेली कीटकनाशके आणि फवारणीचा वाढता खर्च यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्याच्या पूर्व भागासह विविध गावांमध्ये उन्हाळी कांदा लागवडीला वेग आला आहे. लागवडीचा हंगाम सुरू होताच अनेक शेतकऱ्यांनी भविष्यातील पाण्याच्या उपलब्धतेचा अंदाज घेऊन स्वतः रोपे तयार करण्याऐवजी बाजारातून कांद्याची रोपे खरेदी करून लागवडीला प्राधान्य दिले आहे. उपलब्ध कालावधीत लागवड पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
मात्र, कांदा लागवडीपासून काढणीपर्यंतचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने पिकाच्या पोषणासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. त्याचबरोबर रोगराई आणि कीड नियंत्रणासाठी वारंवार कराव्या लागणाऱ्या फवारण्यांमुळे कीटकनाशके, औषधे आणि मजुरीचा खर्चही वाढत आहे. मशागत, रोपांची खरेदी, लागवड मजुरी, पाणीपुरवठा आणि काढणी या सर्व बाबींचा विचार करता कांदा उत्पादनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागत आहे.

विशेष म्हणजे एवढा खर्च करूनही शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल याची कोणतीही हमी नाही. कांद्याचे बाजारभाव सातत्याने बदलत असल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पिकाचे उत्पादन चांगले आले तरी बाजारभाव कोसळल्यास शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्नाची अनिश्चितता अशा दुहेरी संकटात कांदा उत्पादक सापडला आहे.
दुसरीकडे, चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठ्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. लागवडीच्या सुरुवातीलाच मोठी आर्थिक गुंतवणूक केल्यानंतर उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास कांदा पिकाला पुरेसे पाणी देणे कठीण होणार आहे. परिणामी उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.

त्यामुळे यंदा उन्हाळी कांदा लागवड करताना शेतकऱ्यांसमोर पाणी नियोजन, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावाची अनिश्चितता ही तीन मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण, पाण्याचे योग्य नियोजन आणि कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळण्याबाबत ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या अपेक्षेने कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हंगामाच्या शेवटी आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

