
लोणी ( ता.आंबेगाव ) येथील उपबाजार समिती जवळ विठ्ठलवाडी येथील विशाल दत्तात्रय वाळुंज यांच्या घरातून दिवसा ढवळ्या चोरट्यांनी सोन्यावर व रोख रक्कमेवर डल्ला मारून पोबारा केला.
या संदर्भात समजलेली माहिती अशी कि, विशाल दत्तात्रय वाळूंज यांच्या बंद घरातून बुधवार ( दि.०९) रोजी घरातून सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान लोणी येथील विठ्ठलवाडी येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६८,३४४ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ते भाजीपाल्याचे व्यावसाहिक असून घरातील सर्वजण बुधवारी बाजार असल्यामळे बाजारात होते.व घराला कुलूप होते.
चोरट्यांनी सोन्याचे कानातील लटकन-२.१२४ ग्रॅम – २९,११० रुपये, सोन्याच्या वाट्या २ नग-३.७०० ग्रॅम – २७,०१० रुपये, चांदीचे पैजन-४४.६८० ग्रॅम-४,७०० रुपये,चांदीचे पैजन-६.५०० ग्रॅम-२,५२४ रुपये,रोख रक्कम – ५,००० रुपये असा एकूण ६८ हजार ३४४ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
या संदर्भात पारगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९०/२०२६ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०५(अ) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तपास पोलीस जमादार दत्तात्रय जठर,पोलीस हवालदार मडके,पोलीस हवालदार जाधव हे प्रभारी तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. सीसीटिव्ही फुटेज तपासले जात आहेत.








