
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने समर्थ गुरुकुल, बेल्हे येथील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्डीनो वर आधारित तंत्रज्ञानविषयक प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स, प्रोग्रामिंग, सेन्सर आणि स्वयंचलित प्रणालींचा प्रत्यक्ष अनुभव घेत आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली.
कार्यशाळेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागातील विद्यार्थी यश गुंजाळ, वेद कढणे आणि सार्थक देशमुख यांनी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना अर्डीनो प्रोसेसरची मूलभूत माहिती, प्रोग्रामिंग तसेच विविध इलेक्ट्रॉनिक घटकांचे अर्डीनो सोबत इंटरफेसिंग याबाबत मार्गदर्शन केले. केवळ सैद्धांतिक माहिती न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून शिकण्याची संधी देण्यात आली.
यावेळी एलईडी इंटरफेसिंग व प्रकाश सिग्नल प्रणाली, एलसीडी डिस्प्ले, तापमान मापन, आर्द्रता मापन आणि सर्वो मोटर नियंत्रण यांसारख्या विविध प्रकल्पांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विविध सेन्सरच्या माध्यमातून तापमान व आर्द्रतेची माहिती मिळविणे, ती एलसीडी डिस्प्लेवर प्रदर्शित करणे तसेच सर्वो मोटरच्या साहाय्याने उपकरणांच्या हालचाली नियंत्रित करणे याचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.
अर्डीनो च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रोग्रामिंगची सांगड घालून शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी कुतूहल निर्माण झाले. विविध इलेक्ट्रॉनिक घटक जोडणे, त्यांचे कार्य समजून घेणे, प्रोग्राममध्ये आवश्यक बदल करणे आणि अपेक्षित परिणाम मिळविणे या कृतींमधून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेला चालना मिळाली.
या उपक्रमामुळे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासोबतच भविष्यातील विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील संधींची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही नेतृत्वगुण, संवादकौशल्य, संघभावना, वेळेचे नियोजन आणि तांत्रिक ज्ञान प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य विकसित झाले. त्यामुळे या कार्यशाळेचा लाभ शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना झाला.
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजीनियरिंग विभागप्रमुख प्रा. निर्मल कोठारी आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ शरद पारखे ,यांनी या उपक्रमाचे आयोजक प्रा. सुचिता साबळे, प्रा.प्रियांका लोखंडे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
“शिका, प्रयोग करा आणि नव्या कल्पनांतून भविष्य घडवा” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमुळे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाकडे प्रयोगशील आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली.



