
शब्दांकन – रश्मी थोरवे – कुटे
पंचनामा विशेष –
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घोड नदीच्या नयनरम्य तीरावर वसलेले चांडोली बुद्रुक हे एक छोटेसे गाव. याच गावाच्या मुख्य चौकात एक अभिनंदनाचा मोठा फलक झळकत होता. गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका चिमुरडीने पुणे जिल्ह्याच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत (मेरिट लिस्ट) तब्बल अकरावा क्रमांक पटकावला होता, आणि त्या यशाचे कौतुक करण्यासाठी हा फलक उभारण्यात आला होता. एरवी गावागावांत गुणवान विद्यार्थ्यांचे कौतुक करणारे फलक लागतच असतात, मग यात एवढे विशेष काय? असा प्रश्न साहजिकच कुणाच्याही मनात उभा राहू शकतो. परंतु, त्या फलकावर झळकणाऱ्या शांत आणि कमालीचा आत्मविश्वास असणाऱ्या त्या चिमुरडीच्या यशाची आणि संघर्षाची कहाणी ऐकली, तर असे फलक केवळ एका गावात नाही, तर प्रत्येक गावात लागायला हवेत अशीच भावना मनात निर्माण होते. ती केवळ एक विद्यार्थिनी नसून आजच्या पिढीसाठी एक मूर्तिमंत प्रेरणा आहे.
या यशोगाथेची ओळख मला जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संतोष थोरात सरांमुळे झाली. आदिवासी पट्ट्यातील विविध शाळांमध्ये सर गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय निष्ठेने काम करत आहेत. त्यांच्याच माध्यमातून या गुणी मुलीच्या यशाची गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली आणि तिला प्रत्यक्ष भेटण्याच्या ओढीने आम्ही चांडोली बुद्रुक गाव गाठले. थोरात सरांसोबत आम्ही तिचे घर पाहण्यासाठी निघालो. गावावरून जाणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवून आमची पायीच वाटचाल सुरू झाली. रस्त्यालगतचा बैलगाडी शर्यतीचा घाट ओलांडून आम्ही एका अत्यंत कच्च्या आणि खडबडीत पायवाटेने ओढ्याकडे उतरायला लागलो. सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे सगळीकडे हिरवीगार झाडी बहरलेली होती. त्याच ओढ्याच्या काठावर चार-पाच पालांच्या घरांची (तात्पुरत्या झोपड्यांची) एक छोटीशी वस्ती होती. याच वस्तीतील एका कडेचे घर त्या गुणवान मुलीचे, म्हणजेच सुवर्णा बबन आव्हाड हिचे होते.
खरं तर आपण ‘घर’ कशाला म्हणतो? चार पक्क्या भिंती आणि त्यावर ऊन, वारा, पावसापासून संरक्षण देणारे मजबूत छत म्हणजे घर! परंतु, सुवर्णाचे हे घर या व्याख्येच्या आसपासही फिरकणारे नव्हते. घराच्या समोरच शेळ्यांचा एक उघडा गोठा होता आणि त्याला लागूनच पाला-पाचोळ्याच्या कशाबशा उभ्या केलेल्या भिंती होत्या. त्यावर वाळलेल्या लाकडांचे आवरण टाकून आणि वरून प्लास्टिक व ताडपत्री ओढून हा भाग ‘घर’ म्हणून तयार करण्यात आला होता. आम्ही जेव्हा आत गेलो, तेव्हा तिचे आई-वडील तिथेच होते. घरात केवळ गरजेपुरतीच मोजकी भांडीकुंडी आणि सामान होते. पालाच्या भिंतींना इतक्या मोठ्या फटी होत्या की, सोसाट्याचा वारा किंवा रात्रीच्या वेळी एखादा सरपटणारा प्राणीही अगदी सहज आत येऊ शकेल. भर पावसात ओढ्याला पाणी आल्यास हा भाग कधीही पाण्याखाली जाईल, इतक्या धोकादायक जागी हे खोपटे उभे होते. विशेष म्हणजे, ज्या जागेवर ते राहत होते, ती जागाही त्यांच्या मालकीची नव्हती. घरात विजेचा तर कोणताही मागमूस नव्हता. अशा कमालीच्या खडतर, अंधाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीत राहून एका मुलीने संपूर्ण जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक मिळवणे, ही खऱ्या अर्थाने एक अविश्वसनीय आणि थक्क करणारी बाब होती. तिच्या आईशी बोलताना समजले की, सुवर्णा अनेकदा रात्रीची एकटीच उठून अंधारात अभ्यासाला बसत असे. शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल लागल्यानंतर कमी गुण मिळाले म्हणून ती ढसाढसा रडली होती! जिथे दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे, तिथे या मुलीची शिक्षणाप्रती असलेली अफाट ओढ पाहून मन अक्षरशः भरून आले. गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीलाच आपला ‘गुरू’ मानून ही मुलगी अफाट जिद्दीने शिक्षणाची वाट चालत होती.
सुवर्णाच्या या दैदिप्यमान यशाचे तिच्या शाळेतील शिक्षकांनाही प्रचंड कौतुक होते. गावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकही अतिशय मेहनती आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तळमळीने झटणारे आहेत, हे तिथे गेल्यावर प्रकर्षाने जाणवले. सुवर्णाच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आम्ही तिच्या घरी आणि नंतर शाळेत जाऊन तिची भेट घेतली. गावकरी आणि प्रशासनानेही तिच्या या यशाची योग्य ती दखल घेतली होती. तिच्या या संघर्षात आमचाही खारीचा वाटा असावा आणि तिला रोज शाळेत येण्या-जाण्यासाठी सोय व्हावी, या हेतूने आम्ही तिला एक सायकल भेट म्हणून दिली.

मी माझ्या मुलीचा शिष्यवृत्तीचा अभ्यास घेताना या परीक्षेची काठिण्यपातळी अगदी जवळून अनुभवली आहे. पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येण्यासाठी संपूर्ण राज्यातून सर्वात जास्त चुरस असते आणि इथला ‘कटऑफ’ही खूप वरचा असतो. हे सर्व पाहता सुवर्णाने या परीक्षेत मारलेली मजल खरोखरच अद्वितीय आणि अतुलनीय आहे, याची मला खात्री पटली. आपल्या ग्रामीण भागातील आणि विशेषतः वंचित घटकातील मुले गुणवत्तेत कुठेच कमी नसतात, हेच यातून सिद्ध होते. परिस्थितीच्या अंधकाराशी दोन हात करत, भविष्याचा सोनेरी सूर्योदय आपण नक्कीच पाहू, हा ठाम विश्वास त्यांच्या डोळ्यांत असतो. आपली स्वप्ने कशी गाठायची, याचे अचूक भान त्यांना असते. ते आपल्या मार्गदर्शकांचा आदर करतात, यशाने हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचूनही जात नाहीत. सुवर्णा ही या सर्व गोष्टींचे एक जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण आहे. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक हिरे परिस्थितीच्या अंधारात लपलेले असू शकतात, ज्यांना केवळ आपल्या एका प्रोत्साहनाची आणि मदतीच्या हाताची गरज असते. अशी संधी कधी मिळाली, तर ती नक्कीच दवडू नका; कारण तुमचा एक मदतीचा हात एखाद्याचे संपूर्ण आयुष्य प्रकाशमान करू शकतो.
— रश्मी थोरवे-कुटे



