सामाजिक

किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक ; पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाची सर्वेक्षण मोहीम सुरु !!

fb img 1787625523412

पंचनामा प्रतिनिधी – सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डासांची संख्या वाढून किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (NCVBDC) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. किटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. जुलै महिन्यात ४ लाख ७४ हजार ५० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान दुषित पाणीसाठे रिकामे करणे, आवश्यक ठिकाणी अळीनाशक औषधांची मात्रा देणे, रिकामे करता न येणाऱ्या पाणीसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडणे, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पाणी साचणारे खड्डे बुजविणे, बाधित रुग्णांच्या घर परिसरात धुराळणी करणे आणि ‘कोरडा दिवस’ पाळण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

तसेच संशयित तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करणे आणि बाधित रुग्णांना समूळ उपचार देण्याची कार्यवाही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे.

जनजागृतीवरही भर
किटकजन्य आजारांपासून बचावासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर आरोग्य विभागाने विशेष भर दिला आहे. आठवडे बाजार, गटसभा तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यासोबतच जनजागृतीपर बॅनर्स, घोषवाक्ये आणि इतर माध्यमांतून नागरिकांना डासांची उत्पत्ती रोखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

घरातील पाण्याच्या टाक्या, रांजण, बॅरल, हौद आदी पाणीसाठे आठवड्यातून किमान एकदा पूर्णपणे रिकामे करून स्वच्छ करावेत. पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावावे. घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांमध्ये घट्ट झाकणे बसवावे. घरातील व परिसरातील भंगार सामान, फुटके डबे, वस्तू, निरुपयोगी टायर आदींची विल्हेवाट लावावी.

कूलर, मनी प्लांट किंवा चायनीज प्लांटमधील पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलावे. फ्रिजच्या ट्रेमधील पाणी वेळोवेळी काढून टाकावे. डासांपासून संरक्षणासाठी घराच्या दारे-खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा आणि शक्य असल्यास पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावेत.

“डासांची उत्पत्ती रोखणे ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या घरात व परिसरात पाणी साचू न देऊन आरोग्य विभागाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी केले आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997
1010688861
1010688815

Related posts

श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

तमाशा फड मालक,अष्टपैलू कलावंत अमन तांबे यांचे निधन

Chief Editor

धामणी ग्रामपंचायतीत १५% मागासवर्गीय निधीतून खुर्ची व स्पीकर सेट वाटप !!

Chief Editor

Leave a Comment