
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते योजनेचा होणार शुभारंभ
- सायंकाळी ४ वाजेपासून महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
- संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन; ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार लाभार्थी निवड
पंचनामा प्रतिनिधी- राज्यातील ग्रामीण भागातील युवक, युवती आणि शेतकऱ्यांना पशुधनाधारित व्यवसायांच्या माध्यमातून उद्योजक बनवून स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’चा शुभारंभ आज, गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या शुभारंभानंतर आज सायंकाळी ४ वाजेपासून महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी दिली.
या योजनेअंतर्गत अर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार गाय व म्हैस पालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन तसेच व्यवसायासाठी आवश्यक पशुशेड व चारा यांसंबंधीचे घटक निवडण्याचे पर्याय ऑनलाइन अर्जामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाआयटी आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयातून ही अत्याधुनिक ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अर्जदाराने निवडलेल्या घटकांनुसार प्रकल्पाचा एकूण खर्च, त्यासाठी मिळणारे शासकीय अनुदान आणि लाभार्थ्याला भरावा लागणारा उर्वरित आर्थिक हिस्सा यांची स्पष्ट माहिती अर्ज भरतानाच ऑनलाइन प्रणालीवर उपलब्ध होणार आहे.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी आपापला फार्मर आयडी (Farmer ID) आणि महाआयडी (MahaID) तयार करून ठेवावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार होणार असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. योजनेची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
योजनेबाबत काही शंका किंवा अडचणी असल्यास नागरिकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या तालुका किंवा जिल्हास्तरीय कार्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय, पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ९०६३१४२२९९ या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर संदेश पाठवावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.


